बेळगाव : येळळूर येथील कलमेश्वर गल्लीतील घराला आग लागून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवार, दि. 27 रोजी दुपारी घडली. या घटनेत कृष्णा देवाप्पा कडोलकर घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
चूल पेटवली असताना सकाळी 11 च्या दरम्यान घराच्या छताने पेट घेतला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत घरातील फ्रिज,वॉशिंग मशिन, लोखंडी कपाट, कपडे तसेच इतर संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. पाणी गरम करण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी घरात लाकडाचा साठा करण्यात आला होता. त्यामुळेच आगीचा जोरदार भडका उडाला. घराला आग लागताच गल्लीतील तरुणांनी धाडसाने घरातील अन्नधान्य व इतर साहित्य बाहेर काढले. तसेच तात्काळ अग्निशामक दलाला कळविण्यात आले. अग्निशामक दलाचे जवान बंबासह घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तत्पूर्वी गावातील टँकर मागवून नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.