Belgaum Crime News 
बेळगाव

Belgaum Crime : माझ्या मृत्यूला फायनान्सच्या महिला जबाबदार, मुलाला दहावी शिकवा; भिंतीवर लिहून महिलेने...

मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून छळ थांबेना

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव ः मायक्रो फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्रास दिल्याने महिलेने तलावात उडी मारून जीवयात्रा संपविली. माझ्या मृत्यूला फायनान्सच्या महिला जबाबदार असून मुलाला दहावी शिकवा असा संदेश भिंतीवर लिहून तिने जीवन संपविले. गौरव्वा निलाप्पा केंगानूर (वय 36, रा. अनीगोळ, ता. बैलहोंगल) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत बैलहोंगल पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शेती व उपजिविकेसाठी या कुटुंबाने कर्ज घेतले होते. व्याजासह कर्जाची रक्कम वाढत जाऊन 7 ते 10 लाख रुपये झाली होती. हे सर्व कर्ज मायक्रो फायनान्सकडून घेतल्याने त्यांच्याकडून वसुलीसाठी सातत्याने तगादा सुरू होता. या सततच्या त्रासाला कंटाळून सदर महिलेने घरापासून काही अंतरावर असलेल्या तलावात उडी मारून आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी गौरव्वा यांनी घराच्या भिंतीवर डेथनोट लिहिली आहे. यामध्ये लिहिले आहे की, आरुढ बहिणीला व्यवस्थित सांभाळ, माझ्या मृत्यूला कर्ज कारणीभूत आहे. सुमव्वा, मंजव्वा, कस्तुरी या मुलांची जबाबदारी तुमच्यावर आहे. सिद्धाप्पाला दहावी पास कर, हीच माझी शेवटची इच्छा आहे, असे त्यात लिहिले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर सदर महिलेचा तलावातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी तो रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळी तहसीलदार हनुमंत शिरहट्टी, उपनिरीक्षक गुरुराज कलबुर्गी यांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले. भिंतीवरील डेथनोटच्या आधारे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. बैलहोंगल पोलिसांत नोंद झाली असून उपनिरीक्षक कलबुर्गी तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT