बेळगाव : एका कंपनीची फ्रँचायजी देण्याच्या नावाखाली महिलेची तब्बल १ कोटी ६५ लाखांची फसवणूक केल्याच्या घटनेची उद्यमबाग पोलिसांत नोंद झाली आहे.
श्वेता श्रीपती पिसे (रा. पार्वतीनगर, बेळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, उत्तर प्रदेशातील फ्रॅब्रिको क्लिनिंग सोलुशन्स् प्रा. लि., या कंपनीची फ्रँचायजी घेण्यासाठी फिर्याददारांनी काही महिन्यांपूर्वी कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. कंपनीने यामध्ये मोठा नफा मिळेल, असे आश्वासन देत गुंतवणूक करण्यास सांगितले.
त्यावर फिर्याददार महिलेने फ्रँचायजीची अनामत रक्कम, यंत्रोपकरणे, कंपनीची उभारणी अशा सर्व घटकांसाठी तब्बल १ कोटी ६५ लाखांची रक्कम भरली. परंतु, करारानुसार कंपनीने कोणत्याही अटी पाळल्या नाहीत, शिवाय लाभांशही मिळाला नाही. खोटी आश्वासने देत गुंतवणूक करायला लावली व आता गुंतवलेली रक्कमही परत देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे, आपली फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी कंपनीचे भूपेंद्रप्रताप सिंग, अवधेश यादव, जॉर्ज विल्सन, जिब्रान हैदर, मोहीत अग्रवाल, प्रशांत श्रीवास्तव, बालाजी विश्वनाथ, सुरेश एस., ब्रिजेश यादव, आदित्य व सौरव (सर्वजण रा. लखनौ, उत्तर प्रदेश) यांच्याविरोधात फसवणुकीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.