बेळगाव : इंग्लंडचा व्हिसा मिळवून देतो, असे सांगत टप्प्याटप्प्याने २८ लाख १५ हजार रुपये घेतले. परंतु, आता व्हिसाही नाही आणि पैसेही परत देत नाही अशी तक्रार महिलेविरोधात झाली असून, एपीएमसी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मोहिनी पुरुषोत्तमभाई जिंजला (मूळ रा. वालिया गुजरात, सध्या रा. लंडन) असे संशयित महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी नीलेशकुमार कतडभाई कटारिया (रा. सिल्व्हर रे अपार्टटमेंट, सदाशिवनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपल्या मेहुणीला युनायटेड किंगडमचा (इंग्लंड) व्हिसा मिळवू देतो, असे सांगत उपरोक्त संशयित महिलेने मेहुणीकडून टप्प्याटप्प्याने २८ लाख १५ हजार रुपये घेतले आहेत. परंतु, सदर महिलेला आता संपर्क केला असता प्रतिसाद देत नाही. व्हिसाही देत नाही व रक्कमही परत करत नसल्याने कटारिया यांनी फिर्याद एपीएमसी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार नोंद झाली असून, निरीक्षक उस्मान आवटी तपास करत आहेत.