बेळगाव : चार वर्षांपूर्वी तिघांच्या साहाय्याने संगनमताने पतीचा खून केलेल्या महिलेला मार्केट पोलिसांनी अटक केली. खून केलेली महिला त्यावेळी अल्पवयीन असल्याने तिला आधार केंद्रात ठेवले होते. परंतु, तेथून ती पळून गेली होती. आता चार वर्षांनी तिला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. निंगम्मा सागर पुजेरी (वय २२, मूळ रा. सोमनहट्टी, ता. बैलहोंगल, सध्या रा. वंटमुरी कॉलनी, बेळगाव) असे संशयित महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, निंगम्माचा सागर याच्याशी विवाह झाला होता. पतीसह ती बेळगावातील वंटमुरी कॉलनीत राहत होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये तिने तिच्या आणखी तिघा साथीदारांना सोबत घेऊन किल्ला तलावाजवळून पतीचे अपहरण केले. यानंतर कारवार जिल्ह्यातील गणेशगुडी येथे नेऊन त्याचा गळा आवळून खून केला. तेव्हा या प्रकरणाची मार्केट पोलिसांत नोंद होऊन तिच्यासह चौघांविरोधात खुनासह विविध कलमांतर्गत २२ फेब्रुवारी २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला होता.
अल्पवयीनमुळे सुधारगृहात
या खूनप्रकरणी मार्केट पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत म्हणजे २४ फेब्रुवारी २०२१ रोजी चौघांना अटक केली होती. तेव्हा मृताची पत्नी निंगम्मा ही अल्पवयीन असल्याने तिला बसवण कुडचीतील श्री शारदा माता स्वाधार केंद्रात रवानगी केली होती. परंतु, ती तेथून पळून जाण्यात यशस्वी झाली होती. त्यानंतर तिचा गेल्या चार वर्षांपासून शोध सुरू होता.
पोलिसांकडून तपास
ती फरार झाल्यापासून मार्केट पोलिसांकडून तपास सुरू होता. परंतु, ती सापडत नव्हती. मार्केटचे विद्यमान निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी एक आव्हान म्हणून या प्रकरणाचा तपास करत महिलेचा शोध सुरू केला होता. तिची सर्व माहिती घेत गुरुवारी तिला अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता तिची कारागृहात रवानगी केली. पोलिस आयुक्त प्रकाश निकम, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटचे निरीक्षक कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी या महिलेचा शोध घेत तिला अटक केली.