Cyber Crime pudhari photo
बेळगाव

Belgaum Cyber Crime : व्हॉटस्‌ॲप लिंकवरील क्लिक पडली ५२ हजारांना

सरकारी कर भरल्यानंतर पैसे परत मिळतील, असे आमिष दाखवून फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सरकारी कर भरल्यानंतर पैसे परत मिळतील, असे आमिष दाखवून व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून १८ वर्षीय तरुणीची ५२ हजार ६९५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बेळगाव शहर सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (क) आणि ६६ (ड) अन्वये २५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, अपूर्वा शिवानंद गुंडलूर ही तरुणी आर. सी. नगर येथील कामाक्षी अपार्टमेंटमध्ये राहते. ४ ऑक्टोबररोजी ती घरी असताना तिच्या मोबाईलवर व्हॉटस्‌ॲपद्वारे बिग गुरुकुलच्या नावाने एक लिंक पाठवण्यात आली. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तिच्या बँक ऑफ बडोदा खात्यातून वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे पैसे काढण्यात आले. ५ ऑक्टोबर रोजी संबंधित मोबाईल क्रमांकावरून सरकारी कर भरल्यास पैसे परत मिळतील, असा संदेश पाठवण्यात आला. या आमिषाला बळी पडून तरुणीने आणखी काही रक्कम जमा केली. अशा प्रकारे एकूण ५२ हजार ६९५ रुपये तिच्या खात्यातून वळते झाले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अपूर्वाने सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधून तक्रार नोंदवली. सुरुवातीला उद्यमबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुढील तपासासाठी हे प्रकरण बेळगाव शहर सायबर गुन्हे पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार २५ ऑक्टोबररोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT