Belgaum burglary cases: घरफोड्यांमुळे पश्चिम भाग दहशतीखाली Pudhari
बेळगाव

Belgaum burglary cases: घरफोड्यांमुळे पश्चिम भाग दहशतीखाली

बैलुरात घरफोडी : सात तोळ्यांचे दागिने लंपास, चोराची ग्रामस्थांकडून धुलाई

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : तालुक्याच्या पश्चिम भागात घरफोडी, चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. कालमणी आणि हब्बनहट्टी पाठोपाठ आता बैलूर येथे घरफोडीची घटना घडली आहे. तीनपैकी एका चोराला ग्रामस्थांनी पकडून यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या ताब्यात दिले.

बैलूर (ता. खानापूर) येथील गावाबाहेरील पिंपळ वाड्यावर वास्तव्यास असणाऱ्या नामदेव तुकाराम कणकुंबकर यांच्या राहत्या घरात शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास चोरट्यांनी सात तोळे सोने व रोख 70 हजाराची रक्कम लांबवली. कणकुंबकर कुटुंबीयांच्या व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका चोरट्यास पकडण्यात यश आले. मात्र दोघेजण साततोळे सोने व रोख रक्कम घेऊन फरार झाले.

नामदेव कणकुंबकर नेहमीप्रमाणे पत्नीसोबत राहत्या घराला कुलूप लावून जनावरांच्या गोठ्यात दूध काढण्यासाठी गेले होते. पाणी आणण्यासाठी घरी आलेल्या त्यांच्या पत्नीस घराचा कुलूप तोडून चोर शिरल्याची जाणीव झाली. त्यांनी प्रसंगावधान राखत ग्रामस्थांना फोन करून घटनेची माहिती दिली. ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होताच चोरांना जाणीव झाली. पैकी एकाने पळ काढला. त्याला पकडण्यासाठी ग्रामस्थ त्याच्या मागे धावले. ही संधी साधत अन्य दोघे फरार झाले. ग्रामस्थांनी पकडलेल्या चोरास चांगलाच चोप देत खानापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

चोराजवळ मिळालेल्या ओळखपत्रानुसार त्याचे नाव चिदंबर सुतार असून तो तिवोलीचा रहिवासी आहे. खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून चोरास ताब्यात घेतले. बैलूर, जांबोटी परिसरात भीतीचे वातावरण येत्या मे महिन्यात बैलूर गावची ग्रामदेवता महालक्ष्मी यात्रा होणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी पैशांची जुळणी करत यात्रेसाठी लगबग सुरू केली आहे. हीच संधी साधण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. परिणामी घरांची दुरुस्ती, रंगरंगोटी यासारख्या कामांसाठी घरात पैसे ठेवणे कठीण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT