बेळगाव

Belgaum News : जलवाहिनी फुटली; पाण्याची मोठी नासाडी

हिंडाल्कोजवळ राष्ट्रीय महामार्गलगत घटना : दुरुस्तीकामाला प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पुरेशा पावसाअभावी शहरात सध्या पाणीटंचाई जाणवत असतानाच हिडकलमधून बेळगावला येणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना गुरुवारी (दि. १५) सायंकाळी हिंडाल्कोजवळ राष्ट्रीय महामार्गलगत घडली. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. या जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून कर्नाटक पाणीपुरवठा मंडळाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

शहराला राकसकोप आणि हिडकल जलाशयातून मुख्य जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी येते. हिडकलमधून बेळगावकडे येणारी मुख्य जलवाहिनी फुटण्याच्या घटना वारंवार घडतात. उच्च दाबाने पाणीपुरवठा केल्यानंतर असे प्रकार होतात. यापूर्वी होनगाजवळ मुख्यजलवाहिनी फुटल्याची घटना घडली होती. गुरुवारी सायंकाळी हिंडाल्कोजवळ हा प्रकार घडला. जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा प्रचंड फवारा उडाला. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.

शहराला मुख्य जलवाहिनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कर्नाटक पाणीपुरवठा मंडळाची आहे. त्यामुळे हिंडाल्कोजवळ घडलेल्या घटनेची माहिती एलॲंडटी कंपनीने कर्नाटक पाणीपुरवठा मंडळाला दिली. मात्र, जलवाहिनीतू्न होणारा पाणीपुरवठा बंद करेपर्यत लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. महामार्गावर सगळीकडे पाणीच पाणी झाले. आजूबाजूच्या शिवारातही पाणी पसरले.

पाणीपुरवठा मंडळाने जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. त्यामुळे शहरात काही भागात शुक्रवारी होणारा पाणीपुरवठा ठप्प होणार आहे. शहरात शुक्रवारी आठ दिवसाआड पाणीपुरवठा होणार होता. मात्र मुख्य जलवाहिनी फुटल्याने शनिवारी पाणीपुरवठा होईल. उर्वरीत भागातही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती एलॲंडटी कंपनीने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT