Water Crisis pudhari photo
बेळगाव

Belgaum Water Crisis : चोवीस तासांचे पाणी दोन तासांवर!

बेळगावात पाणीबाणी; पाच दिवसांतून एक ते दीड तास होणार पुरवठा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे ऐन हिवाळ्यात बेळगावकरांच्या तोंडचे पाणी पळाले असून उन्हाळ्यात काय अवस्था होणार, याची चिंता लागून आहे. महापालिकेने पाणी कपात सुरू केली असून ज्या भागात चोवीस तास पाणीपुरवठा होत होता, तिथे आता केवळ दोन तास पुरवठा होणार आहे. तसेच ज्या भागात चार ते पाच दिवसांतून एकदा पुरवठा होतो, तिथे एक ते दीड तास पाणीपुरवठा होणार आहे.

मान्सूनमधील पावसाच्या कमतरतेमुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयांमधील पाणीपातळीत लक्षणीय घट झाली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्यामुळे महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी काही उपाय योजना आखल्या आहेत.

ज्या भागांत सध्या अहोरात्र म्हणजेच चोवीस तास पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे, तिथे आता रोज केवळ २ तास पाणीपुरवठा केला जाईल. ज्या भागांत सध्या दर ४ ते ५ दिवसांतून एकदा ३ ते ४ तास पाणीपुरवठा केला जातो, तिथे पाणीपुरवठ्याचा कालावधी कमी करून तो १ ते दीड तासांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. शिवाय पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने ७४५ कूपनलिका आणि ६८ खुल्या विहिरींवरील यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यात आली असून ती कार्यान्वित आहे. त्यामुळे लोकांनी पिण्याचे पाणी उकळून आणि थंड करून प्यावे तसेच पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी केले आहे.

जूनपर्यंत पुरणार काय?

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शहरात दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. शिवाय जूनपर्यंत पाणीपुरवठा होईल, असे नियोजन करण्यात आल्याचेही सांगितले होते, पण आता महापालिकेने मोठ्या प्रमाणात पाणी कपात केल्यामुळे जूनपर्यंत पाणी पुरणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT