संबरगी : अथणी तालुक्यातील अनंतपूर येथील तुकाराम इरकर कुटुंबाने देहत्यागाचा संकल्प मागे घेतल्याचे जाहीर केलेले असले तरी खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासने या कुटुंबाला अनंतपूरमधून बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले आहे. त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे.
8 सप्टेंबर रोजी देहत्याग करणार, असा संकल्प पाच जणांच्या इरकर कुटुंबाने केला होता. ही माहिती कर्नाटक व महाराष्ट्रात वार्याप्रमाणे पसरली होती. त्यानंतर गेले पंधरा दिवस त्या कुटुंबाचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू होता. हरियाणाच्या रामपाल महाराजांचे शिष्य असणारे इरकर कुटुंब महाराजांच्या भक्तीमध्ये मग्न होऊन देगत्याग करणार होते. या पाच जणांसह एकूण 20 जणांनी देहत्याचा संकल्प केला होता. त्यात कुटुंबप्रमुख तुकाराम इरकर यांची मुलगी माया शिंदे (राहणार कुडनुर ता. जत, जि. सांगली) यांनाही बोलावून घेण्यात आले होते. तीसुद्धा देहत्यागास तयार झाली होती.
तालुका प्रशासनाने कुटुंबाच्या घरी भेट देऊन त्यांचे मन वळवले. त्यानुसार गेल्या आठवड्यात या कुटुंबाने पोलिसांना लेखी निवेदन देऊन देहदानाचा संकल्प मागे घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र 8 सप्टेंबर ही तारीख लक्षात घेऊन आरोग्य खाते व पोलिस अधिकार्यांनी रविवारी सकाळी सात वाजता पोलिसांनी ईरकारांच्या घरावाला घेराव घातला. नऊ वाजता ईरकर कुटुंबाला आरोग्य तपासणीसाठी तालुका आरोग्य केंद्रात नेले. तेथून बेळगाव जिल्हा केंद्राकडे पाठविण्यात आले.
अथणी सीपीआय संतोष हळ्ळूर, पीएसआय गिरमल्लाप्पा उप्पार, उपतहसीलदार अमित ढवळेश्वर महसूल, निरीक्षक विनोद कदम, ग्राम लेखाधिकारी नागेश खानापुरे यांनी रविवारी ईरकरांच्या घरी भेट दिली. त्यानंतर पाच लोकांना रुग्णवाहिकेतून बेळगावला पाठविण्यात आले. अथणी तालुका आरोग्याधिकारी डॉ. बसगौडा कागे यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले, त्यांची मानसिक स्थिती खालावली असून, पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. देहत्यागाविरुद्ध जागृती करणारे अॅड. एस. एस. पाटील म्हणाले, तालुका प्रशासनने गंभीर दखल घेऊन गंभीर प्रकार टाळला.
रुग्णवाहिकेतून बेळगावला
रविवारी सकाळी सात वाजता अनंतपूरमध्ये पोलिस अधिकारी दाखल झाले. त्यांनी इरकर कुटुंबाची समजूत काढून रुग्णवाहिकेत बसवले. त्यांची सर्व पुस्तके पोलिसांनी जप्त केली. हीच पुस्तके वाचून त्यांनी वैकुंठाला जाण्याचा संकल्प केला होता, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. आता त्यांचे घर रिकामे असून घराला टाळे ठोकण्यात आले आहे. तुकाराम इरकर, त्यांची पत्नी सावित्री, मुलगा रमेश, सून वैष्णवी, मुलगी माया या पाच जणांना बेळगाव जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. रुग्णवाहिकेभोवती स्थानिकांनी गराडा घातला होता. तुकारामचे वडील पांडुरंग इरकर यांनी, ‘काही करा, पण माझ्या मुलांना चांगले करून परत घरी पाठवा’ अशी विनंती केली आहे.