बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून उष्म्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पाऊस पडेल असे वातावरण निर्माण होत होते. पण, पाऊस काही होत नव्हता. अखेरीस बुधवारी (दि. 1) सायंकाळी अवकाळी पावसाने शहर परिसराला झोडपून काढत उष्म्याची तीव्रता कमी केली. मात्र, हा पाऊस शहरासह काही भागात कोसळला. ग्रामीण भागात हुलकावणी दिली आहे.
ढगाचा गडगडासह विजेच्या कडकडाटासह बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला पावसाचे जोरदार आगमन झाले. या पावसामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली होती. जवळपास तासभर पावसाने झोडपले. यामुळे शहरात काही ठिकाणी पाणीच पाणी झाले. बाजारपेठेतील व्यावसायिकांची पावसाने तारांबळ उडवून दिली. बाजारपेठेतील गटारी मधून पाण्याचा निचरा झाला नसल्याने पाणी रस्त्यावर साचून राहिले होते.
भाजीपाला विक्रते, फेरीवाले या पावसाचा चांगलाच दणका बसला. पावसामुळे पादचारी, दुचाकीस्वार यांना आडोसा शोधावा लागला. तर काहीजण पावसात भिजतच जाताना दिसत होते. पावसाच्या आगमनामुळे हवेत काही वेळ गारवा निर्माण झाला. त्यानंतर पुन्हा उष्म्यामध्ये वाढ झाली होती. शहरामध्ये पाऊस कोसळला तरी ग्रामीण भागात पावसाने हुलकावणी दिली होती. काही गावांमध्ये पाऊस झाला असला तरी म्हणावा तसा जोर नव्हता. शेतीतील मशागतीसाठी दमदार पावसाची गरज आहे. मात्र काही गावामध्ये अजून पावसाने हुलकावणी दिली आहे.