बेळगाव

Belgaum House Theft : उचगावमध्ये मध्यरात्री घरफोडी

दागिने लांबविले; वृद्धेच्या तोंडावर उशी ठेवून चोरी

पुढारी वृत्तसेवा

उचगाव : येथील मठ गल्लीत मंगळवारी मध्यरात्री घर फोडून सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मठ गल्ली येथील लक्ष्मी कृष्णा करडे-मन्नुरकर या आपल्या घरात गाढ झोपेत असताना मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास अज्ञात चोरांनी घराची कौले काढून आत प्रवेश केला. झोपेत असलेल्या लक्ष्मी यांच्या तोंडावर उशी दाबून चोरांनी त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची पाटी बळजबरीने काढून घेतली आणि पोबारा केला. वृद्ध असल्यामुळे लक्ष्मी यांना चोरांचा प्रतिकार करता आला नाही. झटापटीत दागिने ओढताना त्यांच्या तोंडावर जखमाही झाल्या आहेत. घटनेनंतर त्या प्रचंड घाबरल्या होत्या. त्यांनी कसाबसा घराबाहेर येऊन आरडाओरडा केला; परंतु तोपर्यंत चोर पसार झाले होते.

आरडाओरड ऐकून गावकरी त्वरित घटनास्थळी जमा झाले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. काकती पोलिस ठाण्याचे पीएसआय सुरेश शिंगे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ठसे तज्ज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा केले आहेत. तसेच, चोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

भुरट्या चोरांचा सुळसुळाट

सध्या उचगाव गावात भुरट्या चोरांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. सहा महिन्यांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. घरामागील आंघोळीचे तांब्याचे हंडे, सायकली, तसेच शेतातील विद्युत मोटारींच्या केबल चोरीस जात आहेत. पोलिसांनी उचगाव परिसरात रात्रीची गस्त वाढवून भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT