बेळगाव : पूर्ण जून कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये बरसलेल्या पावसाने दिलासा दिला; ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात हायसे चित्रही निर्माण झाले. मात्र गेले तीन दिवस पाऊस उडाला असून राज्यभरात फक्त बेळगाव आणि बागलकोट या दोनच जिल्ह्यांमध्ये सरासरीइतका पाऊस झालेला आहे.
अर्थात् बेळगावातही ९ टक्के कमीच पाऊस झालेला असून, बागलकोटमध्ये १४ टक्के पाऊस कमी झालेला आहे. मात्र २० टक्के पाऊस कमी झाला तरी तो सरासरीइतका मानला जातो. त्यामुळे या दोनच जिल्ह्यांनी आतापर्यंत सरासरी गाठलेली आहे. राज्यातील एकूण ३१ जिल्ह्यांपैकी २९ जिल्ह्यांनी सरासरीही गाठलेली नाही. म्हैसूरमध्ये तर ५७ टक्के कमी पाऊस झालेला आहे. १८ ऑगस्टपर्यंत राज्यात ६०९ मिमी पावसाची नोंद होणे आवश्यक होते.
मात्र केवळ ४२३ मिमी पाऊस झालाे. तब्बल ३१ टक्क्यांची तूट आहे.जुलै अखेरपर्यंत राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये सरासरीइतक्या पावसाने हजेरी लावली होती. ऑगस्टच्या मध्यापर्यंत ही संख्या बेळगाव आणि बागलकोट या दोन जिल्ह्यांपुरती मर्यादित झाली. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कर्नाटकातील २३० तालुक्यांपैकी १८७ तालुक्यांमध्ये पावसाची तूट नोंदवली गेली आहे. पैकी १४ तालुक्यांत तीव्र तूट आहे. सरासरी पावसाच्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त घट नोंदविली आहे.
उत्तर कर्नाटकातही तूट
उत्तर कर्नाटकात २९ टक्के, तर किनारपट्टी प्रदेशात २४ टक्के पावसाची तूट आहे. उत्तर कर्नाटकातील अलमट्टी, हिडकल ही धरणे वगळता राज्यातील बहुतांशी जलाशयात पाण्याची आवक कमी आहे. राज्यभरातील १४ जलाशयांमध्ये ६७३.९२ टीएमसी पाणी साठवले गेले आहे. गेल्या वर्षी १८ ऑगस्टरोजी हाच साठा ७८५ टीएमसी होता.