चावडी : वज्रे नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या दोघा चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भाटपाल नीववाडा धुपेमळ येथे घडली.
ऋतुविक धनंजय नाईक (वय 11, रा. कारवार-कर्नाटक) व ध्रुव उदय वडर (वय 7, नवेवाडे-भाटपाल) अशी मृत बालकांची नावे आहेत. यातील ऋत्विक हा शाळेला सुट्टी असल्याने धुपेमळ येथे मावशीकडे आला होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाटपाल येथील वज्रे नदीकाठी तीन लहान मुले खेळताना आंघोळीसाठी नदीत उतरली. यावेळी नुीच्या खोलपात्राचा अंदाज न आल्याने तिसऱ्या मुलाने अर्धा किलोमीटर अंतरावरील घरी ही माहिती दिली. माहिती मिळताच लोक जमा झाले. यावेळी रोहन या युवकाने धाडसाने नदीत उडी घेऊन शोधाशोध केली. मात्र, काहीवेळानंतर केवळ दोन्ही मुलांचे मृतदेहच हाती लागले.
मला आणखी दोन दिवस राहायचेय...!
ऋतुविक नाईक हा नंदनगदा-कारवार येथील असून शाळेला सुट्टी असल्याने धुपेमळ येथे मावशीच्या घरी आला होता. त्याच्या मावसा सुरेंद्र देसाई यांनी त्याला शुक्रवारीच नंदनगदा येथे पोहचविण्याचे ठरविले होते. मात्र, आणखीन दोन दिवस राहण्याची इच्छा त्याने सांगितली. त्यामुळे रविवारी त्याला नंदनगधाला पोहचविण्याचे ठरले होते. मात्र, त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली.