बेळगाव : तुरमुरीतील (ता. बेळगाव) कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यांतर्गत बुधवारी (दि. 25) ग्राम पंचायतीवर मोर्चा काढून कार्यालयाला घेराव घालण्यात आले. कचरा डेपोमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून तातडीने कचरा डेपो हटवावा, अशी मागणी करण्यात आली.
गेल्या चार दिवसांपासून ग्रामस्थ कचरा डेपोप्रश्नी आक्रमक झाले आहेत. रविवारी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. त्यानंतर सोमवारी रात्री बैठक घेत ग्रामस्थांनी आंदोलनाची धार वाढविण्याचा निर्धार केला. त्यानुसार बुधवारी ग्रामपंचायतींला घेराव घालण्यात आला. गावात कचरा डेपो सुरू करून 20 वर्षे उलटली आहेत. बेळगाव शहराचा कचरा ग्रामदैवत रामलिंगेश्वर मंदिर परिसरातील डोंगरात टाकण्यात येत आहे. यामुळे परिसरातील वातावरण प्रदूषित बनले आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याचे पाणी दूषित बनले आहे. गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर बनली आहे. ग्रामस्थांच्या मुळावर उठलेला कचरा डेपो तातडीने हटविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
प्रारंभी गावातील वेशीत ग्रामस्थ जमा झाले. त्याठिकाणी कचरा डेपो हटावचे फलक घेउन ग्राम पंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कचरा डेपो हटवा, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन पीडीओ लीला मेत्री, सचिव सुतार यांना देण्यात आले. त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी पुंडलिक बेळगावकर, गोपाळ डोणकरी, वैशाली खांडेकर, रघुनाथ खांडेकर, मारुती खांडेकर, चांगदेव बेळगावकर, अनिल तंगाणकर, सोमनाथ बेळगावकर, गोपाळ डोणकरी, राजू जाधव, ज्ञानेश्वर कातकर, बंडू कुद्रेमानीकर, परशराम खांडेकर, बाळाराम बेळगुंदकर, किरण गोजगेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.