बेळगाव

Karnataka : तुळूला दर्जा, मराठीला अल्पसंख्य हक्‍कही नाहीत

महात्मा गांधींच्या सुराज्याच्या संकल्पेनेलाच कर्नाटक सरकारकडूनच सुरुंग

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : महात्मा गांधी यांनी स्वराज्याबरोबर सुराज्याची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेतूनच त्यांनी संपूर्ण देश एक केला होता. आता कर्नाटक सरकारने तुळू भाषेला अधिकृतपणे द्वितीय राज्यभाषेचा दर्जा दिला. स्थानिक भाषांचा गौरव करणारा हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. पण, सीमाभागात लाखोंच्या संख्येने मराठी भाषिक असून त्यांचे मात्र कानडीकरण करण्याचा सपाटा सरकारकडून होत आहे. त्यामुळे महात्मा गांधींच्या सुराज्याच्या संकल्पनेलाच सुरुंग लावण्याचा प्रकार सरकारकडून होत आहे.

तुळू ही कर्नाटकची समृद्ध भाषा आहे. प्रामुख्याने उडुपी आणि मंगळूर भागात तिचे वर्चस्व आहे. त्यामुळे तेथील लोकांनी कानडीकरणाच्या वरवंट्यात आपली घुसमट होऊ नये, यासाठी वेगळ्या तुळूनाडू म्हणजे राज्याची मागणी लावून संघर्ष ठेवला होता. सरकारने या चळवळीला वाव मिळू नये, यासाठी प्रामुख्याने तेथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तुळू भाषेला दोन राज्यांत द्वितीय राज्यभाषेचा दर्जा दिला आहे.

दुसरीकडे बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह संपूर्ण सीमाभागात लाखो लोकांची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेकडे कर्नाटक सरकार सातत्याने दुर्लक्ष करत आहे. केवळ दुर्लक्षच नव्हे तर प्रशासकीय दमणशाही वापरुन मराठी भाषेला चिरडण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. बेळगाव जिल्ह्यातील ५०० पेक्षा जास्त गावांमध्ये मराठी बहुसंख्येने आहे. येथे मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला जातोय. मराठी शाळांत शिक्षक नाहीत. गेल्या १० वर्षांत अनेक मराठी शाळा बंद पडल्या आहेत किंवा कन्नड शाळांमध्ये विलीन केल्या आहेत. सर्व सरकारी कार्यलयांत मराठीतून एकही अर्ज स्वीकारला जात नाही. मराठीत फलक लावल्यास गुन्हा दाखल होतो.

कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तुळू आणि कोडवा भाषेला प्रोत्साहन गुण मिळतात, पण मराठीला मिळत नाही. सीमाभागातील मराठी भाषिक हा या मातीतला मूळ भाषिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते कित्तूर राणी चन्नम्मापर्यंत या भागाचा इतिहास मराठीशी जोडलेला आहे. तरीही मराठी भाषेवरच अन्याय का, असा संतप्त सवाल कायम आहे. राज्यातील सरकार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वावर चालते, बोले तैसा चाले, अशी जाहिरातबाजी करत आले आहे. पण, सीमाभागातील मराठी भाषेवरील अन्यायाकडे डोळेझाक केली आहे. तुळू भाषेला द्वितीय राज्यभाषेचा दर्जा दिला असला तरी मराठीला साधा भाषिक अल्पसंख्याक अधिकार दिले नाहीत. त्यामुळे यातूनच सरकारचा दुतोंडीपणा उघडकीस येतोय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT