बेळगाव : जिल्ह्याच्या विविध भागात गत आठवडाभरापासून ऊस दरासाठी आंदोलन करण्यात येत होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाची झळ सर्वच भागात पोहोचली होती. या आंदोलनामुळे बससेवेवर परिणाम झाला. त्यामुळे सुमारे दोन कोटी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
बसेसचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांची संख्या कमी झाली. विविध भागात निदर्शने, रास्तारोको आंदोलन, बंद आदी कारणांमुळे परिवहन महामंडळाला सुमारे 2.05 कोटी रूपयांचा फटका बसला आहे. चिकोडी विभाग 1.76 कोटी त बेळगाव विभागाचा 29 लाख रूपयांचा महसूल बुडाला आहे. चिकोडी विभागात रोज विविध मार्गावरून 669 बसेस धावतात. आंदोलनामुळे गेल्या आठवड्यात या बसेस धावल्या नाहीत. काही बसेसचे मार्ग बदलण्यात आले. मात्र, प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाल नाही.
ऑक्टोबर 2025 मध्ये बस वाहतुकीतून परिवहनचे रोजचे उत्पन्न 1.30 कोटी होते, अशी परिवहन महामंडळाचे चिकोडी विभागीय वाहतूक अधिकारी ए. आर. छब्बी यांनी दिली. बेळगाव विभागातून रोज 640 बसेस धावतात. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे काही मार्गांवरील बससेवा विस्कळीत झाली आहे. प्रवासी संख्येतही घट झाली आहे. त्यामुळे अपेक्षित महसूल मिळत नाही, अशी माहिती परिवहन महामंडळाचे बेळगाव विभागीय नियंत्रक के. एल. गुडेणवार यांनी दिली.