निपाणी : निपाणीसह परिसरात शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने तूर्तास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंद होण्याचा धोका टळला आहे. त्यामुळे महामार्गावरून वाहतूक बिनधास्त सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
संततधार पावसामुळे शुक्रवारी सकाळी महामार्गावर मांगूर फाट्यानजीक कुंभार शेताजवळ पर्यायी महामार्गाला जोडणार्या सर्व्हिस रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे कोल्हापूरहून बेळगावकडे होणारी वाहतूक संथगतीने सुरू होती. पोलिस प्रशासन व रस्ते बांधकाम कंपनीने महामार्गालगत चर खोदून आणि सिमेंटच्या पाईप टाकून मार्गावर येणार्या पाण्याला वाट करून दिली होती. सायंकाळपर्यंत पाणीपातळी वाढत गेल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला होता.
घटनास्थळी डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, रमेश पवार, रस्ते देखभाल औताडे कंपनीचे परिसर निरीक्षक विजय दाईंगडे, भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे, अक्षय सारापुरे यांनी भेट देऊन मांगूर फाटा ते वेदगंगेवरील पूर्वेकडील वाहतूक पश्चिमेकडील रोडवर वळवून एका लेनमधून आंतरराज्य वाहतूक सुरू ठेवली होती.
शनिवारी सकाळी पश्चिमेकडील बाजूने वेदगंगेच्या पात्रातील पाणी सर्व्हिस रस्त्याला येऊन धडकल्याने महामार्ग बंद होण्याची भीती लक्षात घेऊन मुरूम टाकून पाणी अडविले होते. दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने वेदगंगेच्या पाणी पातळीत घट होण्यास मदत झाली. एका लेनमधून वाहतूक सुरू असून पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.