बेळगाव : ट्रेडिंग व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असे आमिष दाखवून अनगोळ येथील एका व्यावसायिकाला ४८ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई, बिहार आणि हरियाणातील चौघांविरुद्ध टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शब्बीर (वय ५२, रा. अनगोळ) यांनी याबाबत २४ ऑक्टोबर रोजी रात्री फिर्याद दिली आहे. संशयितांनी ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून ४८ लाख २५ हजार रुपये घेतले. मात्र, पैसे घेतल्यानंतर आश्वासनाप्रमाणे व्यवसाय केला नाही किंवा गुंतवलेली रक्कमही परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खोजा यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी मोहम्मद आन इर्शाद अहमद शेख (रा. बांद्रा पूर्व, मुंबई), मोहम्मद फारुक बद्रुल अमाना (रा. समस्तीपूर, बिहार), रुचित भटनागर (रा. सेक्टर ५६, गुरुग्राम, हरियाणा) आणि मनोजकुमार श्रीमंत साळुंखे (रा. नवीन पनवेल, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. टिळकवाडी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.