बेळगाव

Belgaum Cyber Fraud: ॲपद्वारे व्यापाऱ्याची ९८ हजारांची फसवणूक

बनावट अपॉईंटमेंट ॲपचा वापर : अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : आईच्या उपचारासाठी रुग्णालयात अपॉईंटमेंट घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बेळगावातील एका व्यापाऱ्याची ९८ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रुग्णालय अपॉइंटमेंट बुकिंग नावाची बनावट एपीके फाईल मोबाईलवर डाउनलोड करुन त्याला आवश्यक परवानग्या दिल्यानंतर ही फसवणूक झाली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमाननगर येथील व्यापारी संजीवकुमार शिवाजी रन्नोरे (वय ५७) आपल्या आईसाठी डॉ. आर. एल. पाटील यांच्याकडे अपॉइंटमेंट मिळविण्यासाठी गुगलवर संपर्क क्रमांक शोधत होते. त्यावेळी त्यांना एक मोबाईल क्रमांक मिळाला. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर समोरच्या व्यक्तीने ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्यास सांगत ‘रुग्णालय अपॉईंटमेंट बुकिंग’ नावाची बनावट ॲप फाईल पाठवली.

ही फाईल सुरुवातीला त्यांच्या मोबाईलवर उघडली नाही. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या सांगण्यावरुन ती फाईल त्यांच्या पत्नीच्या अँड्रॉइड मोबाईलवर उघडल्यानंतर आवश्यक परवानग्या देण्यात आल्या. त्यानंतर दुपारी चार वाजता अपॉइंटमेंट निश्चित झाल्याचे सांगून संबंधिताने फोन बंद केला.

काही वेळातच रन्नोरे यांच्या बँक खात्यातून नकळत ९८ हजार २ रुपये ऑनलाईन व्यवहाराद्वारे वळते झाल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी खात्याची पडताळणी केली असता फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने शहर सीईएन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय तक्रारीच्या आधारे अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित मोबाईल क्रमांक, बँक खात्यांतील व्यवहार आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT