चिकोडी : चिकोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांची वाहने जप्त केली आहेत.
२० सप्टेंबर रोजी रात्री १० ते २१ सप्टेंबरला पहाटे ५ च्या दरम्यान करोशी येथील रहिवासी बसवराज गाडीवड्डर यांनी आपल्या घरासमोर उभा केलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी बसवराज यांनी चिकोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. बी. बसरगी, चिकोडी उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर आणि पोलिस निरीक्षक विश्वनाथ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडी पोलिस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने २ कारवाई करत तीन अटक केली.
नदीम रमजान अम्मणगी (वय २२, रा. इंगळगी, ता. हुक्केरी), मब्बूसोब काशिम अंकली (वय १८, रा. बसरगी तोट इंगळी, ता. हुक्केरी), प्रभाकर मल्लप्पा तेली (वय २२, रा. नदीगुडिकेतर, ता. हुक्केरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ट्रॅक्टर ३,१५,००० रुपये, ट्रॉली १,७०,००० रु., दुचाकी ३५,००० असा एकूण ५,२०,०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सीपीआय विश्वनाथ चौगुले, पीएसआय शिवकुमार बिरादार तसेच कर्मचारी एस. आर. भागाई, गजानन एस. कांबळे, एस. पी. गलगली, रामू जी. कुक्कोळी, विजयकुमार बी. पाटील, रमेश एस. हादिमनी आणि तांत्रिक विभागाचे विनोद ठकण्णवर यांचे जिल्हा पोलिस प्रमुखांनी कौतुक केले आहे.