खानापूर : गोवा सरकारने बेळगाव-पणजी मार्गावरील मोलेम चेक पोस्टवर कार्यान्वित केलेली स्वयंचलित वाहन कागदपत्र पडताळणी यंत्रणा कर्नाटकातील वाहनचालकांना डोकेदुखी ठरली आहे. धूर नियंत्रण प्रमाणपत्र (पीयुसी) वैध असतांनाही केवळ वाहन प्रणालीशी डेटा न जोडल्याने कर्नाटक पासिंगच्या वाहनांना तब्बल दहा हजार रुपयांच्या दंडाची आकारणी केली जात आहे. परिणामी ख्रिसमस आणि नववर्षाच्या पर्यटन काळात वाहन चालकांना गोव्याचा प्रवास नको रे बाबा म्हणण्याची वेळ आली आहे.
गोव्यात वाहन प्रमाणीकरण प्रणाली 7 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली असून गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना स्वयंचलित कागदपत्र पडताळणी सक्तीची करण्यात आली आहे. रामनगर अनमोड मार्गावरील मोलेम, चोर्ला मार्गावरील केरी, कारवार मार्गावरील पोळेम आणि दोडामार्ग मार्गावरील पत्रादेवी या चार ठिकाणी हे स्वयंचलित कागदपत्र पडताळणी नाके सुरु करण्यात आले आहेत. या प्रणालींतर्गत शेजारील राज्यांमधून गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची स्वयंचलित कागदपत्र पडताळणी केली जात आहे.तथापि धूर नियंत्रण प्रमाणपत्र असूनही पडताळणी केंद्रातील कॅमेऱ्यात स्कॅन होत नसल्याने अनेक वाहनांना तब्बल दहा हजाराचा दंड आकारला जात आहे. यामुळे कर्नाटकातील वाहनधारकातून संतापाची लाट उसळली आहे. स्वयंचलित कागदपत्र पडताळणी केंद्रांवर वाहन प्रणालीशी डेटा न जोडल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
सिस्टम अद्ययावत करा अन्यथा आंदोलन
गोव्याचे संपूर्ण अर्थकारणच पर्यटन व्यवसायावर चालते. यामध्ये कर्नाटकातून येणाऱ्या प्रवासी वाहतुकीचा मोठा वाटा आहे. तथापि सदोष कागदपत्र पडताळणी यंत्रणेच्या जाचामुळे वाहनचालकांनी मोठ्या प्रमाणात गोव्याकडे पाठ फिरवली असून अनेक हॉटेल बंद पडली आहेत. स्वयंचलित कागदपत्र पडताळणी केंद्रातील संगणकीय प्रणाली अद्ययावत करुन त्यातील दोष दूर करावेत. त्यानंतरच या यंत्रणेचा वापर व्हावा. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा गोव्यातील हॉटेल व्यावसायिकांनी दिला आहे.