बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा काळा दिन बंद पडावा, यासाठी पोलिसांनी नेत्यांवर दबाव घालण्यास सुरुवात केली आहे; मात्र या दबावासमोर न झुकता यावर्षीचा काळा दिन पाळणारच, असा निर्धार समिती नेत्यांनी व्यक्त केला असून पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसीला कायदेशीर उत्तर देण्याची तयारी केली आहे.
1 नोव्हेंबरच्या काळ्या दिनाच्या तोंडावर पोलिस प्रशासनाने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर आणि प्रकाश मरगाळे यांना खबरदारीसंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटिसीला मंगळवारी (दि. 28) उत्तर देण्यात आले असून प्रत्येकी पाच लाख रुपयांचा जामीन आणि वैयक्तिक हमी देण्यात आली. पोलिसांनी समिती नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या नोटिसीला महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांनी कायदेशीररीत्या उत्तर देणार असून कितीही दडपशाही झाली, तरी 1 नोव्हेंबर रोजी काळ्यादिनी सायकल फेरी निघणारच, असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे.
पोलीस प्रशासनाने बजावलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे व मालोजी अष्टेकर यांनी मंगळवारी पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांच्या वीरभद्र नगर येथील कार्यालयात जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत पाच लाखाचे वैयक्तिक हमीपत्र आणि पाच लाखांचा जामीन सादर केला. समितीच्या वतीने ॲड. महेश बिर्जे, ॲड. वैभव कुट्रे यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता केली.
नोटिसीतच त्रुटी
प्रशासनाने बजावलेल्या नोटिसीत अनेक कायदेशीर त्रुटी आहेत. नोटिसीत कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आलेली नाही. कायदा प्रक्रियेचे उल्लंघन करून प्रशासनाने मराठीद्वेष्टेपणा दाखवत सदर नोटीस बजावली आहे त्यामुळे त्या नोटिसीला समिती कायदेशीर आव्हान देणार आहे. कितीही दबाव आणला, तरी मराठी मन दडपता येणार नाही. 1 नोव्हेंबरला काळ्यादिनी सायकल फेरी काढली जाणारच. पोलिसांच्या नोटिसीने मराठी जनतेचा आवाज थांबणार नाही. परिणामांची तमा न बाळगता सायकल फेरी निघणारच, असे कार्याध्यक्ष किणेकर यांनी स्पष्ट केले.