बेळगाव : बेळगाव-गोकाक मार्गावर भरधाव व बेदरकारपणे टिप्पर चालवून पादचाऱ्याला चिरडून ठार करणाऱ्या चालकाला मारिहाळ पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे. अपघातानंतर चालक फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत त्याला जेरबंद केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, १ जुलै २०२६ रोजी रात्री दाखल झालेल्या तक्रारीनुसार १ जुलै रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास बेळगाव-गोकाक रस्त्यावरील मुचंडीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने रस्त्याकडेने पायी चाललेल्या राजू रामा अष्टेकर (वय ४६, रा. चंदगड-अष्टे) यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मरिहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या अपघातानंतर पोलिस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. अपघातस्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि वाहनाच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास केला असता टिप्परने त्यांना धडक दिल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान पोलिसांनी संशयित चालक अडवेशप्पा गंगप्पा मास्तमर्डी (रा. प्रभूनगर, ता. खानापूर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने कबुली दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. संशयिताला अटक केल्याबद्दल वरिष्ठांनी मारिहाळ पोलिसांचे कौतुक केले आहे.