बेळगाव : युनियन जिमखान्यावर गोळीबार करण्यासाठी आलेला मुख्य संशयित अद्याप फरारीच आहे. परंतु, त्या दिवशी सोबत असलेल्या वाहनचालकासह तिघांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. आठवड्यापूर्वी दोघांना अटक केली असून बुधवारी साहिल निंगाडे (वय ३०, रा. पुणे) याला अटक केली. तिघांपैकी एकाकडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केल्याचेही पोलिसांनी सांगितले. प्रफुल्ल पाटील हा महाराष्ट्रात फिरत असून तपासासाठी गेलेल्या पथकाला सातत्याने चकवा देत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
युनियन जिमखान्यावर १४ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास रमीचा डाव रंगलेला असताना प्रफुल्ल पाटील याच्यासह काहींनी जाऊन सुरेश जालगार (४२, रा. जालगार गल्ली) याला धमकी देत पिस्तूल रोखली होती. त्यानंतर हवेत गोळीबार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरू केला.
गोळीबार झालेल्या दिवशी रात्री साडेआठच्या सुमारास प्रफुल्ल पाटील हा काही साथीदारांसह वाहनातून युनियन जिमखाना परिसरात गेला. तेथे त्याने सुरेशवर पिस्तूल रोखले. परंतु, ऐनवेळी पिस्तूल लॉक झाल्याने गोळी उडाली नाही. ती संधी साधून सुरेश पळून गेला. यानंतर जिमखाना पटांगणात जाऊन प्रफुल्लने हवेत दोनवेळा गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
आलेल्या वाहनातून प्रफुल्ल व त्याचे अन्य साथीदार पळून गेले. या वाहनावर तेव्हा रोहन पोकळे (रा. पुणे) हा चालक होता. त्याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. याच काळात आदिराज अनिल सुतार (रा. कामत गल्ली, बेळगाव) यालाही अटक केली. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सापडली. या दोघांचीही अधिक चौकशी करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची कारागृहात रवानगी केली होती. घटना घडली तेव्हा त्यांच्यासोबत साहिलदेखील असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यालाही अटक झाली.
प्रकरणातील मुख्य संशयित प्रफुल्ल अद्याप फरारी आहे. त्याच्या तपासासाठी बेळगावातून दोन पथके महाराष्ट्र व अन्य राज्यात गेली होती. परंतु, तो सातत्याने जागा बदलत असून पोलिसांना चकवा देत आहे. त्यालाही लवकरच जेरबंद करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.