बेळगाव : शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश, पाठ्य़पुस्तके देण्याच तयारी शिक्षण खात्याने केलेली असली तरी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याला ६२ टक्केच पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. अद्यापही ३८ टक्के पुस्तकांचा पुरवठा व्हायचा आहे. शाळा सुरू होण्यास ५ दिवस शिलक आहेत. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व पाठ्यपुस्तके मिळणार का, असा प्रश्र्न आहे.
बेळगाव शहर विभागातून पाठ्यपुस्तकांसाठी सर्वाधिक मागणी आहे. शहरात एकूण ८ लाख ७० हजार ९२४ पाठ्यपुस्तकांची आवश्यकता असून त्यापैकी ५ लाख ५४ हजार २१ पुस्तके पुरवण्यात आली आहेत. बेळगाव ग्रामीण तालुक्यात ७ लाख २८ हजार पुस्तकांच्या मागणीपैकी ४ लाख ९५ हजार २६० पुस्तकांचा पुरवठा झाला आहे.
खानापूर विभागात ४ लाख १७ हजार ४२३ पुस्तकांच्या मागणीच्या तुलनेत ३ लाख २५ हजार ५५० पुस्तके पुरवण्यात आली आहेत. बैलहोंगल तालुक्यात ४ लाख ८९ हजार २३५ पुस्तकांची मागणी असून त्यापैकी ३ लाख ८० हजार ५५० पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. रामदुर्ग तालुक्यात ५ लाख ३४ हजार २९९ पाठ्यपुस्तकांची मागणी असून त्यापैकी ४ लाख १५ हजार ५६० पुस्तके पुरवण्यात आली आहेत.
कित्तूर विभागात २ लाख ४० हजार ७२ पुस्तकांची मागणी आहे. त्यापैकी १ लाख २० हजार ५० पुस्तकांचे पुरवठा झाला असून, सौंदत्ती तालुक्यात ७ लाख ३६ हजार ५९१ पुस्तकांची आवश्यकता आहे. त्यापैकी ५ लाख ४५ हजार ७५० पाठ्यपुस्तके मिळाली आहेत.