बेळगाव ः एका खासगी शाळेतील शिक्षिकाच महिलेच्या बॅगेतील दागिने चोरताना रंगेहाथ सापडल्याची घटना बुधवारी (दि. 14) सीबीटीवर घडली. परंतु, ज्या महिलेचे दागिने गेले होते तिने फिर्याद दिली नसल्याने सदर चोर महिलेवर गुन्हा दाखल झाला नाही.
पती लष्करात असल्याने हैदराबादमध्ये राहणारी महिला बुधवारी दुपारी बेळगावला आली. तिचे माहेर खानापूर तालुक्यातील पारिश्वाड असल्याने ती बिडी बसमध्ये चढत होती. यावेळी तिच्या मागे असलेल्या एका महिलेने तिच्या बॅगेची चेन सरकवत सोन्याचे मंगळसूत्र असलेली डबी चोरली. बसमध्ये चढताच तिने बॅग तपासली असता मंगळसूत्र नसल्याचे सांगत आरडाओरडा सुरु केला. यावेळी मार्केटचे पोलिस शिवानंद मडीवाळ येथे कार्यरत होते. त्यांनी तातडीने ही माहिती पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांना दिली. त्यांनी बस जाऊ देऊ नका, अशी सूचना करत दहा जणांचे पोलिस पथक पाठविले. काही महिला व पुरुष पोलिसांनी बसला चारीही बाजूंनी घेरले. बसमधील प्रत्येकाची तपासणी करणार आहोत, असे पोलिसांनी सांगितले. यावेळी ज्या महिलेने मंगळसूत्र चोरले होते तिने डबीतून मंगळसूत्र काढून ते खिडकीतून बाहेर फेकले व डबी आपल्या बॅगेत ठेवली. ते फेकताना एका पोलिसाने पाहिले. पोलिसांनी तिची बॅग तपासली असता त्यात डबी सापडली. सदर डबी आपलीच असल्याचे तक्रारदार महिलेने सांगितल्यानंतर या महिलेची कसून चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी तिची उशिरापर्यंत चौकशी केली. परंतु, या प्रकरणाची सदर महिलेने फिर्याद न दिल्याने तिला पुन्हा असा प्रकार न करण्याची तंबी देऊन सोडून दिले.