बेळगाव : राज्य सरकारने अखेर तालुका पंचायत व जिल्हा पंचायतींच्या निवडणुकांसाठी आरक्षण प्रमाण जाहीर केले आहे. महिलांना निम्मे आरक्षण दिले असून बेळगाव जिल्ह्यातील १५ तालुका पंचायतींमध्ये महिलाराज राहणार आहे. जिल्ह्यात तालुका पंचायतींसाठी एकूण ३०१ जागा असून यापैकी १५४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. हे प्रमाण अर्ध्यापेक्षा अधिक आहे.
एकूण ३०१ जागांमध्ये अनुसूचित जातीसाठी ३७, अनुसूचित जमातीसाठी २८, मागासवर्गीय अ साठी ६८, मागासवर्गीय ब साठी १४ जागा राखीव आहेत. उर्वरित १४७ जागा खुल्या आहेत. राखीव आरक्षणामध्ये मागासवर्गीय अ साठी सर्वाधिक ६८ जागांचा समावेश आहे. महिला आरक्षणांमध्येही मागासवर्गीय अ प्रवर्ग आघाडीवर आहे. ६८ जागांपैकी ३९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीच्या ३७ जागांमध्ये २१ महिलांना, अनुसूचित जमातीसाठीच्या २८ जागांपैकी तब्बल २० जागा महिलांसाठी, मागसवर्गीय ब च्या १४ जागापैकी ६ जागा महिलांसाठी राखीव आहेत.
तालुकानिहाय सदस्यसंख्येत बेळगाव तालुका आघाडीवर आहे. बेळगाव ता. पं. मध्ये ३२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये १६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. हुक्केरीत २९, अथणी २८, रायबाग २३, चिकोडी बैलहोंगल आणि रामदुर्गमध्ये प्रत्येकी २२, गोकाक, सौंदतीत प्रत्येकी २१, खानापूर आणि निपाणी तालुका पंचायतीत प्रत्येकी २० जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
तालुकानिहाय आरक्षणामध्ये अनेक फरक जाणवतात. मागासवर्गीय अ प्रवर्गासाठी बेळगाव आणि अथणी तालुक्यात प्रत्येकी ७ जागा राखीव आहेत. बैलहोंगल, खानापूर, चिकोडीत प्रत्येकी ६, अनुसूचित जाती आरक्षण निपाणी, रामदुर्ग, रायबाग आणि अथणी तालुक्यात प्रत्येकी ४ जागा राखीव आहेत. अनुसूचित जमाती आरक्षणातून बेळगाव तालुक्यात ५ जागा राखीव आहेत. आरक्षण प्रमाणाच्या प्रमाणानुसार महिला आणि मागासवर्गीय आरक्षणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करताना राजकीय नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. योग्य उमेदवार निवडीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
नेत्यांची लागणार कसोटी
आरक्षण प्रमाण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची नजर मतदारसंघनिहाय आरक्षणाकडे लागून राहिली आहे. मतदारसंघनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर नेत्यांची कसोटी लागणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवार आणि आरक्षणानुसार जातनिहाय उमेदवार शोधताना अडचण निर्माण होणार आहे. त्याचबरोबर सामान्य गटातून लढण्यास इच्छुक असणाऱ्यांना संधीपासून वंचित राहावे लागणार आहे.