बेळगाव : महसूल विभागाकडून जमिनींच्या कागदांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांनी बुधवारपासून कामावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे भूदाखल्यांचे संगणकीकरण काम ठप्प झाले आहे. मागील तीन महिन्यांपासून वेतन थकीत आहे.
राज्यभरात महसूल खात्याकडून जमिनीच्या कागदांचे संगणकीकरण काम सुरू आहे. यासाठी बेळगाव जुन्या तहसील कार्यालयात काम सुरू आहे. यासाठी 10 हंगामी कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, त्यांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून देण्यात आलेेले नाही. यामुळे कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. हंगामी कर्मचाऱ्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन मागील आठवड्यात दिले होते. तरीदेखील त्यांचे वेतन अदा करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे कामगारांनी बुधवारपासून संपावर जाणे पसंद केले आहे. यामुळे संगणकीरणाची कामे ठप्प झाली आहेत.