बेळगाव

Belgaum Sweet Mart Raid: बेळगावात स्वीट मार्टवर छापे

दोन दुकानांतील मुदत संपलेली मिठाई केली नष्ट

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने बेळगावा शहरातील स्वीट मार्ट व मिठाई विक्री केंद्रांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवून दोन स्वीट मार्टमधील मुदत संपलेली मिठाई आणि चॉकलेट पावडर नष्ट केली. तपासणीदरम्यान मुदत संपलेले खाद्यपदार्थ, अयोग्य लेबलिंग तसेच नियमांचे उल्लंघन आढळून आले. कारवाईमुळे मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यभरात अन्न सुरक्षा नियमांचे पालन होते की नाही, हे तपासण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बेळगावातील मिठाई उत्पादन व विक्री केंद्रांचीही तपासणी करण्यात आली.

महामार्गाजवळच्या एक आणि बेळगाव शहरातील एका दुकानात खाद्यपदार्थांच्या साठवणुकीतील त्रुटी, आवश्यक माहिती नसलेले लेबल तसेच मुदत संपलेले पदार्थ आढळून आले. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर एका स्वीट मार्टमध्ये सुमारे १० किलो मुदत संपलेला चॉकलेट फ्लेवर जप्त करण्यात आला. तसेच सुमारे ५ किलो रसगुल्ल्याची अन्न सुरक्षा विभागाच्या नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली.

तपासणीदरम्यान संशयास्पद खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या तपासणीसाठी शासकीय अन्न प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. प्रयोगशाळेतील चाचणी अहवाल आणि तपासणीत आढळलेल्या उल्लंघनांच्या आधारे संबंधित स्वीट मार्ट व खाद्य व्यवसाय चालकांविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न सुरक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. मुदत संपलेले किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विक्रीस ठेवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT