बेळगाव : मानवी इतिहासातील नोंदींनुसार गेली 11 वर्षे सर्वात उष्ण ठरली आहेत. त्यातही गेली तीन वर्षे अतिउष्ण आहेत. या तीन वर्षांची तापमानवाढीची सरासरी 1.5 अंश असून, 2026 हे वर्ष तर इतिहासातील अतिउष्ण वर्ष ठरण्याचे संकेत आहेत, असे डब्ल्यूएमओ (वर्ल्ड मेटरोलॉजिकल ऑर्गनायझेशन) या जागतिक हवामान अभ्यास संस्थेने म्हटले आहे.
2024 चा उन्हाळा आतापर्यंतचा अतिउष्ण होता. मात्र, यंदा हा विक्रम मोडीत निघण्याचा अंदाज कॅनडा तसेच इंग्लंडच्या हवामान निरीक्षण संस्थांनी व्यक्त केला आहे. 2026 चे सरासरी तापमान हे औद्योगिक क्रांतीपूर्व (इ. स. 1850-1900) पातळीपेक्षा 1.35 ते 1.53 अंशाने अधिक असेल. जागतिक सरासरी तापमान किमान 1.4 अंशाने वाढणारे 2026 हे सलग चौथे वर्ष ठरणार आहे. शिवाय हवामानतज्ज्ञांच्या संकेतानुसार 2026 ते 2030 हा पाच वर्षांचा कालखंडच आतापर्यंतचा सर्वात उष्ण ठरेल.
कारणे काय : तीन वर्षांत जागतिक तापमानात झालेली अभूतपूर्व वाढ ही अंशतः 2023-24 मधील तीव्र ‘एल निनो’मुळे झाली आहे. त्याशिवाय मानवनिर्मित कारणे आहेतच.
वाढते काँक्रिटीकरण : जागतिक तापमानवाढीचे हे एक प्रमुख कारण आहे. काँक्रीट आणि डांबरासारखे पदार्थ गडद रंगाचे असल्याने त्यांची औष्णिक वस्तुमान क्षमता जास्त असते. परिणामी, ते दिवसा मोठ्या प्रमाणात सौर किरणोत्सर्ग शोषून घेऊन रात्री उष्णतेच्या स्वरूपात परत हवेत सोडतात.
इमारतींचे रंग : पांढऱ्या रंगाच्या इमारतीही जागतिक तापमानवाढीत योगदान देतात. पांढऱ्या इमारतींमुळे आतील उष्णता कमी होत असली, तरी सूर्यकिरण पांढऱ्या रंगावरून परावर्तित होऊन वातावरणात मिसळत असल्याने तापमान वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच वाढत्या नागरिकरणामुळे जंगलांचा वेगाने ऱ्हास होत आहे.
साठलेली उष्णता : शहरांमधील दाट बांधकामामुळे अर्बन कॅनायन्स (शहरी दऱ्या) तयार होतात. परिणामी, हवेचा प्रवाह बंदिस्त होऊन उष्णता अडकून राहते.
परिणाम काय?
वाढत्या उष्णतेमुळे सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसेल. पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल. पाणीटंचाईमुळे पाण्यात पसरणारे आजार वाढतील. सुमारे 3 अब्ज लोकांना तापमानवाढीचा फटका बसेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे.