बेळगाव : उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी जाहीर केलेल्या प्रतिटन ३,६०० रुपये दराला शेतकऱ्यांनी अंतिम मान्यता दिली असून या दरानुसार साखर कारखान्यांशी करार करण्याबाबतही शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी संघटनांनी आंदोलन छेडले होते. प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरु करु देणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली होती. यासाठी हत्तरगी टोलनाक्यापासून शेतकऱ्यांनी पदयात्रा काढली होती. ही पदयात्रा बेळगावच्या दिशेने येत असताना विविध टप्प्यांवर आंदोलन तीव्र करण्यात आले. मुक्तीमठात मुक्काम केल्यानंतर गुरुवारी कित्तूर चन्नम्मा चौकात धडक देऊन तीव्र आंदोलन करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू करून शेतकऱ्यांना मुक्तीमठातच ताब्यात घेतल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळाले.
दरम्यान, पालकमंत्री जारकीहोळी यांनी उसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर देण्याची घोषणा केली होती. मात्र, सुरुवातीला या दराला शेतकरी संघटनांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. प्रतिटन एक हजार रुपये अतिरिक्त प्रोत्साहनपर अनुदान शासनाने द्यावे, अशी मागणीही करण्यात येत होती. त्यामुळे दराचा तिढा कायम राहिला होता. शासन आणि शेतकरी नेत्यांमध्ये झालेल्या चर्चांनंतर अखेर प्रतिटन ३,६०० रुपये दर स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
शेतकरी नेते चुनाप्पा पुजारी यांनी पत्रकारांशी बोलताना आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. प्रतिटन ३,६०० रुपये दराला अंतिम मान्यता देण्यात आली असून या दराबाबत साखर कारखान्यांशी करार करण्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. त्यामुळे केवळ आंदोलन स्थगित न ठेवता ऊस दराबाबतचा निर्णय स्वीकारून कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु करण्यास सहमती दर्शविण्यात आली आहे.