St Bus News file photo
बेळगाव

Karnataka News : बसप्रवास महाग

आजपासून २३ टक्के; लघु पल्ल्याच्या तिकिटात ९ रुपयांनी वाढ

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : दूध दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने त्रस्त झालेल्या जनतेला आता आणखी एका दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाड्यात २३ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर लघु पल्ल्याच्या बसच्या प्रवास भाड्यात कमाल ९ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. बुधवारी पत्रकारांशी बोलताना परिवहनमंत्री भैरती सुरेश यांनी तिकीट दरवाढीची माहिती दिली.

सुरेश म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून बस प्रवास भाड्यात वाढ करण्यात आली नव्हती. डिझेलच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढ तसेच एकूण कार्यचालन खर्च वाढल्यामुळे परिवहन महामंडळांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर दरवाढीसाठीचे प्रमाण ठरवण्यासठी वरिष्ठ आयएएस अधिकारी अतुलकुमार तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीच्या शिफारशींच्या आधारे परिवहन महामंडळांची आर्थिक स्थिती व सर्वसामान्य जनतेचीही स्थिती लक्षात घेऊन कोणावरही मोठा आर्थिक भार पडणार नाही, अशा पद्धतीने अल्प प्रमाणात प्रवास भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंत्री सुरेश म्हणाले.

आर्थिक तोट्यात असलेल्या परिवहन महामंडळांच्या विकासासाठी काय उपाययोजना कराव्यात, याचा अभ्यास करण्यासाठी २०२१ मध्ये एम. आर. श्रीनिवास मूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने प्रवास भाडेवाढीसह काही शिफारशी केल्या होत्या. मात्र परिवहन महामंडळांनी त्यावेळी भाडेवाढीचा निर्णय घेतला नव्हता. २०२६ मध्ये अतुलकुमार तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक परिवहन भाडे नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीच्या शिफारशीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.

शक्ती नव्हे, डिझेल महागल्यामुळे

महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा देणाऱ्या शक्ती योजनेमुळे परिवहन महामंडळांना आर्थिक नुकसान होत असल्याचा विरोधकांचा आरोप मंत्री सुरेश यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, प्रत्यक्षात महामंडळे कोणतीही योजना स्वतःच्या खर्चातून मोफत राबवत नाहीत. महिलांनी बसमधून केलेल्या प्रवासाचे संपूर्ण भाडे राज्य सरकार वेळोवेळी थेट महामंडळांना अदा करत आले आहे. त्यामुळे त्या योजनेमुळे तोटा झालेला नाही. तो तोटा वाढला तो डिझेल महागल्यामुळे.

किती वाढ?

बस प्रवास भाड्यात सरासरी २३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सामान्य बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीत जास्त ९ रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. जलदगती बसमधील प्रवासासाठी १० टप्प्यांपर्यंत भाडेवाढ करण्यात आली असून, किमान १९ रुपयांपासून कमाल ६८ रुपयांपर्यंत भाडेवाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वातानुकूलित ऐरावत, ड्रीम क्लास व अंबारी बस सेवांच्या भाड्यात ६ किलोमीटरच्या प्रवासासाठी ५ रुपये, ६ ते १८ किलोमीटरच्या प्रवासासाठी १० रुपये, तर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी कमाल १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. टक्केवारीच्या हिशेबाने ही वाढ १६ ते ३७ टक्क्यांपर्यंत आहे.

सुधारित प्रवास भाडे बुधवारी ४ रोजी मध्यरात्रीपासून लागू झाले आहे. साध्या बसमधून कमी प्रवास करणाऱ्यांना कमीत कमी, तर लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना जास्तीत जास्त ९ रुपयांपर्यंत अधिक भाडे द्यावे लागणार आहे. बीएमटीसीच्या बस प्रवास भाड्यात किमान ३३ टक्क्यांपासून कमाल ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. काही मार्गांवर ६ ते १२ रुपयांपर्यंत अधिक भाडे द्यावे लागणार आहे. दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी ४ रुपये, तर चार किलोमीटरच्या प्रवासासाठी ६ रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT