Satish Jarkiholi 
बेळगाव

Belgaum Sugarcane Price : उसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर जाहीर

पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांची घोषणा : उद्यापासून कारखाने सुरू करण्याचे आवाहन, शेतकऱ्यांचा निर्णय गुलदस्त्यात

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : ऊस दरावरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकिहोळी यांनी बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन ३,६०० रुपये दर जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. ४) शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. तसेच गुरुवारपासून साखर कारखाने सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

मात्र, शेतकऱ्यांनी प्रतिटन ३,६५० रुपये दर देण्याची मागणी केली आहे. त्यावर आता प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. काही शेतकऱ्यांना हा दर मान्य आहे. तर काही शेतकऱ्यांना हा दर मान्य नाही. उसाला योग्य दर मिळाल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीला पालकमंत्री जारकिहोळी, माजी खासदार राजू शेट्टी, उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी राहुल शिंदे, पोलिस आयुक्त प्रकाश निकम, जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी प्रतिटन ३,६५० रुपये दर देण्याची मागणी लावून धरली. शेतकऱ्यांच्या मागणीवर चर्चा झाल्यानंतर पालकमंत्री जारकिहोळी यांनी बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन ३,६०० रुपये दर देण्याची घोषणा केली. या दरानुसार कारखान्यांनी गाळप सुरू करावे आणि शेतकऱ्यांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, मंत्र्यांनी जाहीर केलेला ३,६०० रुपयांचा दर शेतकऱ्यांना मान्य नसून प्रतिटन ५० रुपये वाढवून ३,६५० रुपये दर द्यावा आणि त्यानुसार कारखान्यांनी ऊस गाळप सुरू करावे, अशी मागणी शेतकरी प्रतिनिधींनी केली. त्यामुळे ३,६०० रुपयांच्या घोषणेनंतरही दराचा तिढा कायम राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आंदोलनाबाबत उत्सुकता कायम

पालकमंत्र्यांनी दर जाहीर करून कारखाने सुरू करण्याचे आवाहन केले असले तरी शेतकरी संघटना हा तोडगा मान्य करणार की आपला आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे गुरुवारपासून साखर कारखान्यांचे गाळप प्रत्यक्षात सुरू होणार का? शेतकरी आंदोलन मागे घेणार का? आणि ३,६५० रुपयांच्या मागणीवर सरकार आणखी काही निर्णय घेणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT