बेळगाव : गेल्या १२ दिवसांपासून सुरू असणारे उस दराचे आंदोलन गुरुवारी मागे घेतल्याने शुक्रवारपासून उस तोडणीला प्रारंभ झाला. आता ग्रामीण भाग आगामी चार महिने गजबजणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटकात उस दरासाठी मागील महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. यामुळे उस तोडणी हंगाम लांबणीवर पडला होता.
साखर कारखान्यांनी उस गाळप हंगाम सुरू करण्यासाठी टोळ्या आणल्या आहेत. त्या गावागावांतून दाखल झाल्या होत्या. परंतु, आंदोलनामुळे उस तोडणीला प्रारंभ झाला नव्हता. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांनी गुरुवारी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर शुक्रवारपासून तोडणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात चंदगड तालुक्यातील साखर कारखान्यांच्या उस तोडणी टोळ्या दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून उस तोडणीला प्रारंभ झाला आहे.
यावर्षी पावसाअभावी पाण्याची समस्या जाणवणार आहे. परिणामी शेतकरी उस तोडणीसाठी घाई करणार आहेत. घाईने उस तोडणी केल्यास पुढील पीक घेणे सोयीस्कर ठरणार आहे. यामुळे येत्या काळात उस तोडणीला वेग येणार आहे.