बेळगाव

Belgaum News : ऊस जळतोय; शेतकरी होरपळतोय!

ट्रान्सफॉर्मरच्या ठिणग्यांनी उसाच्या फडांना आग : वाढत्या प्रकारांमुळे शेतकरी संकटात

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : खानापूर तालुक्यात विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून उडणाऱ्या ठिणग्यांमुळे ऊस पिकांना आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोमवारी (दि. २६) कान्सुली, रामगुरवाडी आणि गणेबैल परिसरात सुमारे ४८ एकर ऊस जळून खाक झाल्याच्या घटना ताज्या असतानाच मंगळवारी (दि. २७) पारिश्वाड क्रॉस आणि गुंडपी-हलशीवाडी परिसरात पुन्हा आग लागून १५ एकरांतील ऊस जळाला आहे.

मंगळवारी सकाळी पारिश्वाड क्रॉसजवळील शेतकरी जोतिबा धाकलू घाडी यांच्या ऊस पिकाला आग लागली. त्यानंतर दुपारी गुंडपी-हलशीवाडी परिसरातील सर्वे क्रमांक १६८ ते १७१ मधील शेतांमध्येही ट्रान्सफॉर्मरमधून ठिणग्या उडाल्याने आग भडकली. सागरे व नंजीनकोडल परिसरातील शेकडो मजुरांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मोठे संभाव्य नुकसान टळले.

आगीत गुंडपी येथील हुवाप्पा दामोदर अळवणी व पूजा प्रभाकर अळवणी, तसेच हलशीवाडी येथील रोहन रामा देसाई, रामचंद्र लक्ष्मण देसाई, शंकर दत्तात्रय देसाई आणि महाबळेश्वर दत्तात्रय देसाई यांच्या ऊस पिकांचे नुकसान झाले. भाजप नेते प्रमोद कोचेरी, गुंडू तोपिनकट्टी, संजय कुबल आणि लैला साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी बाळासाहेब शेलार यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली.

सलग आगीच्या घटनांमुळे ट्रान्सफॉर्मर व वीजवाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हेस्कॉमने तातडीने तपासणी करुन आवश्यक उपाययोजना कराव्यात, नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT