बेळगाव

Students Social Initiative : फराळ पाहून ऊसतोड मजुरांचे डोळे पाणावले

हणबरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी साजरी केली आगळीवेगळी दिवाळी

पुढारी वृत्तसेवा

कोगनोळी : हणबरवाडी (ता. निपाणी) शाळेतील विद्यार्थ्यांनी यंदा आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. गुरुवारी सकाळी शाळेतील सर्व विद्यार्थी हातात फराळाच्या पिशव्या घेऊन ऊस तोडणी कामगारांच्या तांड्यावर पोहोचले. रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक विद्यार्थ्यांचा हा अनोखा उपक्रम कुतूहलाने पहात होते. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे ऊस तोडणी कामगारांचे डोळे पाणावले.

ऊस तोडणी कामगारांच्या वस्तीजवळ पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत आणलेल्या फराळाच्या पिशव्या कामगारांना भेट देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांकडून अचानक मिळालेल्या या प्रेमाच्या भेटीने ऊस तोडणी कामगार भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या हातातील फराळ पाहून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसोबत दिवाळीचा आनंदही साजरा केला.

संस्कारांचे धडे आणि मूल्यशिक्षण केवळ पुस्तकातून शिकायचे नसते, तर ते प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणायचे असते. याचा प्रत्यय या उपक्रमातून हणबरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना आला. सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि इतरांच्या आनंदात सहभागी होण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. शाळेच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. यावेळी कृष्णात खोत, एसडीएमसी अध्यक्ष सचिन पाटील, विठ्ठल कोळेकर, सागर खोत, तुकाराम शिंदे, अमोल यादव, प्रवीणसिंह शिलेदार, दशरथ कुंभार यांच्यासह सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT