बेळगाव : शहरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी आता सावगावजवळची जागा महापालिका निश्चित करणार आहे. बुधवारी (दि. २३) महापालिकेकडून या जागेची पाहणी करण्यात येणार आहे.
महापालिकेकडून आता हिरेबागेवाडीजवळ मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करण्यात येत आहे. शहरात किमान तीन नसबंदी केंद्रे असावीत, अशा सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आणखी एक नसबंदी केंद्र सुरु करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. आता सावगावजवळ हे केंद्र उभारण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यासाठी मंगळवारी जागा पाहणी करण्यात येणार होती. पण, ही पाहणी आता बुधवारी सकाळी होणार आहे.
हिरेबागेवाडीजवळ असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी केंद्राला लोकांनी विरोध केला आहे. त्यामुळे आता सावगावजवळ नसबंदी केंद्र उभारणीलाही लोकांचा विरोध होण्याची शक्यता आहे. शहरातील मोकाट कुत्री तालुक्यात नेण्यात येणार असल्यामुळे लोकांचा विरोध होण्याची शक्यता आहे.
महापालिकेकडून श्रीनगरमध्ये मोकाट जनावरांसाठी गोशाळा उभारण्यात आली आहे. पण, त्याठिकाणी जनावरांची निगा व्यवस्थित होत नाही, अशा तक्रारी आल्यामुळे आणि कोंडुसकोप्प येथील महावीर गोशाळेने शहरातील मोकाट जनावरांची देखभाल करण्यासाठी तयारी दर्शविल्यामुळे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी श्रीनगरऐवजी कोंडुसकोप येथील गोशाळेत जनावरे पाठविण्याच्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज महापालिका, पेटा आणि प्राणी दया संघटनेची बैठक झाली. यावेळी मोकाट जनावरांना पकडून त्यांची कोंडुसकोप्प येथील गोशाळेला जनावरे पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या. शिवाय मोकाट कुत्र्यांसाठी फिडिंग झोन, नसबंदी केंद्र अशा विषयांवर चर्चा करण्यात आली.