बेळगाव : राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या बीपीएड पात्रताधारक क्रीडा शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. पात्र शिक्षकांना ग्रेड-१ क्रीडा शिक्षक पदावर बढती देण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. शिक्षण आयुक्तांनी बढतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून नियमांनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेने प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या बीपीएड पात्रताधारक क्रीडा शिक्षकांना बढती देण्याची मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर बढती प्रक्रियेच्या हालचालींना वेग आला आहे. भरती नियमांचे पुनरावलोकन करुन बढतीची प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरु आहे. सेवानिवृत्ती, शैक्षणिक पात्रता आणि अन्य आवश्यक निकष विचारात घेऊन उपलब्ध रिक्त पदांच्या आधारे बढतीस पात्र शिक्षकांची निवड केली जाणार आहे. या प्रक्रियेत जिल्हा उपसंचालक हे बढती आणि नियुक्ती प्राधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची सुमारे एक हजार पदे रिक्त असल्याची माहिती आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये होणाऱ्या १५ हजार शिक्षक भरती प्रक्रियेत ग्रेड-१ आणि ग्रेड-२ क्रीडा शिक्षकांची ६०० पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बढती प्रक्रिया सुरु झाल्यास पात्र शिक्षकांना वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी मिळू शकते. माध्यमिक शाळांमधील क्रीडा शिक्षण शिक्षकांची कमतरता कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
दर सहा महिन्यांनी बढती प्रक्रिया
उपलब्ध रिक्त पदे आणि बढतीस पात्र असलेल्या शिक्षकांची माहिती संकलित करुन दर सहा महिन्यांनी बढती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र शिक्षकांना बढतीच्या अधिक संधी उपलब्ध होण्याबरोबरच शाळांमधील क्रीडा शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासही मदत होऊ शकते. शिक्षण खात्याच्या पुढील कार्यवाहीकडे राज्यातील क्रीडा शिक्षकांचे लक्ष लागले आहे.