बेळगाव

Belgaum Accident: भरधाव कारची ट्रकला धडक; एक ठार

गोटूरजवळ पहाटे झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी

पुढारी वृत्तसेवा

संकेश्वर : मालवाहू ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील एकजण ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. गोटूर (ता. हुक्केरी) येथे पहाटे ५ च्या सुमारास हा अपघात घडला. हनुमंत यमाजी पायाळ (वय ५५) असे मृताचे नाव असून जखमींवर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बंगळूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहू ट्रक जात असताना मागून भरधाव येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील हनुमंत पायाळ यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

मृत हनुमंत पायाळ हे मूळचे सापनाई (ता. कळंब) येथील असून सध्या कात्रज सातारा रोड-पुणे येथे वास्तव्यास होते. जखमींमध्ये महानंदा हनुमंत पायाळ (वय ४५), अनिल दाजीराम अंगारके (वय ५०), अजय अनिल अंगारके (वय २८) व सुनीता अनिल अंगारके (वय ४५) यांचा समावेश असून हे सर्व पुणे येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हुबळी येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी ते कारने जात असताना गोटूर हद्दीत हा अपघात झाला. कार पुण्याहून संकेश्वरमार्गे हुबळीला जात होती. मालवाहू ट्रक संकेश्वरहून धारवाडकडे जात होता. कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच संकेश्वरचे पोलिस निरीक्षक गणपती कोगनोळी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. घटनेची नोंद संकेश्वर पोलिस ठाण्यात झाली असून अजय अंगारके यांनी फिर्याद दाखल केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT