Crime News  pudhari
बेळगाव

Belgaum crime: जावयाचा सासूवर चाकूने हल्ला

संशयित अटकेत : हल्ल्यासंबंधीचे स्टेटस व्हॉट्‌स ॲपला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : क्षुल्लक कारणातून सासूवर राग धरत चाकूने हल्ला करणाऱ्या जावयाला मुरगोड पोलिसांनी अटक केली. अरविंद महादेवाप्पा गवळी (वय २६, रा. मंटूर, जि. धारवाड) असे संशयिताचे नाव आहे. विशेष म्हणजे हल्ल्यानंतर त्याने तो स्टेटस आपल्या व्हॉट्स ॲपला ठेवल्याने चांगलीच चर्चा रंगली.

या घटनेत महादेवी रायाप्पा करीगार (वय ४५, रा. आलदकट्टी, ता. यरगट्टी) या जखमी झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी अरविंदचा जखमी महादेवी यांची मुलगी कल्पना हिच्याशी विवाह झाला. दोन महिन्यांपूर्वी या दांपत्याला मुलगा झाला असून ती सध्या माहेरीच राहते. व्हिडिओ कॉल करुन मुलाला दाखव, असे अरविंद तिला सातत्याने सांगत होता. ती व्हिडिओ कॉल करायची.

परंतु, एकदा तिने आपला हात दुखतोय असे म्हणत व्हिडिओ कॉल बंद करते, असे सांगितले. यावरुन अरविंद चिडला. माझ्या मुलाला दाखवताना तुझा हात कसा काय दुखतो, असे म्हणत त्याने भांडायला सुरवात केली. यावेळी जवळच असलेल्या सासूनेही त्याला चांगलेच खडसावले. यावरुन चिडलेला जावई अरविंद हा सायंकाळी सासरवाडीला गेला. येथे पुन्हा सासूशी भांडण काढत त्याने शिवीगाळ सुरु केली. यानंतर सोबत आणलेल्या चाकूने त्यांच्या पोटावर व हातावर वार केले. यामध्ये त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी मुरगोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून संबंधिताला अटक केली.  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT