Belgaum Solar Energy 
बेळगाव

Belgaum Solar Energy: सौरऊर्जा अफाट, पण ग्राहकांची पाठ

बेळगाव शहरातील स्‍थिती : ३.७८ लाख ग्राहकांपैकी केवळ १,२४९ जणांकडून वापर

पुढारी वृत्तसेवा
प. य. पालकर

बेळगाव : वीज बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी सौरऊर्जेचा वापर वाढविण्याचे आवाहन सातत्याने केले जात असले तरी बेळगाव शहरातील नागरिकांकडून सौरऊर्जेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. शहरात हेस्कॉमचे तब्बल ३ लाख ७८ हजार ८३० ग्राहक आहेत. त्यापैकी केवळ १,२४९ ग्राहक सौरऊर्जेचा वापर करत आहेत. म्हणजेच एकूण ग्राहकांपैकी अवघे ०.३२ टक्के ग्राहक सौरऊर्जेकडे वळले आहेत.

शहराची लोकसंख्या सुमारे सहा लाखांच्या घरात असून महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात सुमारे १ लाख ५७ हजार ६०० आस्‍थापने आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने आस्‍थापने असतानाही सौरऊर्जेचा वापर अत्यल्प असल्याने जनजागृतीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हेस्कॉमकडून ग्राहकांना सौरऊर्जेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती केली जात आहे. सौरऊर्जेमुळे पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होण्यासोबतच दीर्घकाळात वीज खर्चात बचत होऊ शकते. सौरऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना वीजबिलातही विविध प्रकारच्या सवलती उपलब्ध आहेत.

मात्र, कर्नाटक सरकारच्या गृहज्योती योजनेंतर्गत पात्र ग्राहकांना शून्य किंवा अत्यल्प वीजबिलाचा लाभ मिळत असल्याने अनेक ग्राहक सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. परिणामी, सौरऊर्जेचा प्रसार करण्यासाठी शासन आणि हेस्कॉमकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना अपेक्षित गती मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, केंद्र सरकारची प्रधानमंत्री सूर्यघर योजना घरगुती ग्राहकांसाठी उपलब्ध असून, त्याद्वारे घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. शेती क्षेत्रातही पीएम-कुसुम योजनेंतर्गत सौरऊर्जेला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गृहज्योतीचा परिणाम की जनजागृतीचा अभाव

राज्यात गृहलक्ष्मी योजनेंतर्गत बहुंताश ग्राहकांना शून्य वीज बिल येत आहे. शून्य वीजबिलामुळे सौरऊर्जेकडे दुर्लक्ष की जनजागृतीचा अभाव? असा प्रश्न सध्या उपस्‍थित होत आहे. पर्यावरणपूरक आणि स्वस्त ऊर्जेचा पर्याय असलेल्या सौरऊर्जेचा वापर बेळगाव शहरात वाढविण्यासाठी प्रशासनाला अधिक प्रभावी जनजागृती करण्याची गरज आहे.

हेस्कॉमकडून ग्राहकांना सौरऊर्जेबाबत सातत्याने माहिती दिली जात आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनादेखील सुरू करण्‍यात आली आहे. शेतीसाठी पीएम-कुसुम योजनेंतर्गत सौरऊर्जेला चालना देण्यात आली आहे. ग्राहकांनी या योजनांचा लाभ घेऊन सौरऊर्जेचा वापर वाढवावा.
-अरविंद गदगकर शहर अभियंता, हेस्कॉम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT