बेळगाव ः दिवाळीच्या काळात हवेच्या प्रदूषणात नेहमी वाढ होत असते. दिल्ली, मुंबई यासारख्या मेट्रो शहरांत हवेच्या गुणवत्तेबाबत (एक्यूआय) सातत्याने चिंता व्यक्त केली जात असताना आता गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ख्याती असलेले बेळगावही राज्यातील प्रदूषित शहरांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. या यादीत कर्नाटकात बेळगाव सहाव्या स्थानी आहे. हावेरी शहर पहिल्या स्थानी आहे.
राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वात प्रदूषित दहा शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये हावेरी शहराचा पहिला क्रमांक असून तेथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 98 इतका आहे. या यादीत बेळगाव शेजारील जुळी शहरे असलेल्या हुबळीचा तिसरा आणि धारवाडचा पाचवा क्रमांक आहे. या दोन्ही शहरांतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे 86 आणि 77 इतका आहे. बेळगाव सहाव्या स्थानी आहे. बेळगावच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 76 इतका आहे. धारवाड आणि बेळगावमध्ये केवळ एका अंकाचा फरक आहे.
राज्यात सर्वाधिक महसूल आणि औद्योगिकीकरणात बंगळूरनंतर बेळगावचे नाव घेतले जाते. बेळगावचा झपाट्याने विकास होत असला तरी बेळगावची हवा मात्र दिवसेंदिवस प्रदूषित होत चालली आहे. त्यामुळे शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब चिंतेची असल्याचे बोलले जात आहे. शुद्ध हवा, समतोल तापमान आणि ग्रामीण बाज यामुळे बेळगावला वेगळी ओळख प्राप्त झाली होती. पण, गेल्या काही वर्षांत ही ओळख पुसत चालली आहे. उत्तर कर्नाटकातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच बेळगावचे तापमान वाढू लागले आहे. वेगवेगळ्या कारणांनी हवेचे प्रदूषण होत आहे. अनेक प्रकल्प अर्धवट आहेत. त्यामुळेही हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.
साधारणतः हवेचा गुणवत्ता निर्देशांक 100 वर पोचल्यानंतर ते शहर धोक्याच्या यादीत येत असते. देशातील काही शहरांतील हवा या स्थितीवर पोचली आहे. पण, आता कर्नाटकातील अनेक शहरांची वाटचालही त्याच दिशेने सुरू झाली आहे. त्यामध्ये सध्या बेळगावचा क्रमांक सहावा आहे.