SIR process 
बेळगाव

Karnataka SIR Process : मुदत संपली; ७ लाखांवर मतदार अधांतरी

एसआयआर प्रक्रिया अपुरी; २२ ऑक्टोबरपर्यंत आक्षेपांवर निकाल

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : एसआयआर प्रक्रियेतून कमी करण्यात आलेल्या मतदारांना नोटिसा पाठवून सुनावणीची मुदत १२ ऑक्टोबरला संपली आहे. आतापर्यंत राज्यात ३५ लाख ६० हजार सुनावण्या झाल्या असून ७ लाख ८२ हजार सुनावण्या प्रलंबित आहेत. २२ ऑक्टोबरपर्यंत यावर निकाल होणार असून २७ ऑक्टोबरला अंतिम यादी जाहीर होणार आहे. पण, यादीतून नावे वगळलेल्या अनेक मतदारांना अद्याप नोटीसच मिळाली नसल्याने त्यांची नावे कशी समाविष्ट केली जाणार, हा प्रश्र्न आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कच्च्या (प्रारूप) मतदार यादीत राज्यातील ४३ लाख ८२ हजार मतदारांची गावे कमी झाली आहेत. बेळगाव जिल्ह्यात हा आकडा ५ लाख १३ हजार ४३९ इतका आहे. राज्यात ८२ टक्के सुनावण्या पूर्ण झाल्या आहेत. प्रलंबित आक्षेपांवर २२ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होणार आहे.

बेळगाव जिल्ह्यात एसआयआरअंतर्गत एकूण ५,१३,४३९ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामध्ये मृत मतदार १,३४,९०३, कायम स्थलांतरित मतदार २,८३,२४९, इतर ठिकाणी नोंद असलेले म्हणजेच दुबार मतदार ६८,६०६ आणि ज्यांचा पत्ता मिळाला नाही असे २६,४५९ मतदार आहेत.

यामध्ये ज्यांच्या माहितीत तफावत किंवा तार्किक दोष आढळला आहे, अशा ८४,४२२ मतदारांना बीएलओंमार्फत नोटीस बजावण्यात येणार आहे, तसेच नाव वगळलेल्या सर्व ५,१३,४३९ लोकांना सुद्धा हरकत नोंदवण्यासाठी नोटीस दिली जाणार असून, त्यांना फॉर्म ६ भरून पुन्हा नाव समाविष्ट करण्याची संधी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली होती. आता १२ ऑक्टोबरला सुनावणीची मुदत संपली आहे. तथापि, अनेक मतदारांना नोटीस मिळालेली नाही. ज्यांना नोटीस मिळाली, त्यांची सुनावणी २२ ऑक्टोबरपर्यंत होईल.

नोटीस न मिळालेल्यांचे काय?

जिल्ह्यातील अनेक मतदारांना कच्च्या मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे; पण त्यांना अद्याप नोटीसही देण्यात आली नाही. त्यामुळे आपले नाव मतदार यादीत येईल की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सर्व मतदारांना नोटीस दिली आहे. नोटीस दिल्याची सही आणि संबंधितांचा फोटोही घेतलेला असतो, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एसआयआर कामाबद्दल अजूनही साशंकता उपस्थित करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT