Cyber Fraud Pudhari
बेळगाव

Belgaum Cyber Fraud : सीमकार्ड बंद पडताच बँक खाते रिकामे

निपाणीतील पेंटरला अडीच लाखांचा गंडा

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : मोबाईल सीमकार्ड अचानक बंद पडले आणि बँक खात्यातून तब्बल २ लाख ४८ हजार रुपये गायब झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. सुरेश सुतार (रा. आश्रयनगर, निपाणी) या पेंटर व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कोणालाही बँकेचा पासवर्ड किंवा ओटीपी न देता तसेच एटीएम कार्डही हरवलेले नसताना खात्यातील रक्कम गायब झाल्याने या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत सुतार यांनी गुरुवारी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश सुतार यांचे सीमकार्ड रविवारपासून अचानक बंद पडले होते. मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने त्यांनी सुरुवातीला याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र, सीमकार्ड सुरू होत नसल्याने त्यांनी जवळच्या केअर सेंटरशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना दुसरे सीमकार्ड घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यांनी नवीन सीमकार्ड घेतले. बुधवारी सकाळी नवीन सीमकार्ड कार्यान्वित झाल्यानंतर मोबाईल सुरू झाला. त्यानंतर बँक खात्याची माहिती घेतली असता खात्यातून तब्बल २ लाख ४८ हजार रुपये काढण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला.

या घटनेत शयास्पद बाब म्हणजे सीमकार्ड रविवारपासून बंद होते आणि बुधवारी ते सुरू झाल्यानंतर खात्यातील रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले. सीमकार्ड बंद पडण्यामागे तांत्रिक बिघाड होता की सायबर गुन्हेगारांनी जाणीवपूर्वक सीमकार्ड स्वॅपिंगचा प्रकार केला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. सीमकार्ड स्वॅपिंगमध्ये मूळ मोबाईल क्रमांकाचे दुसरे सीमकार्ड कार्यान्वित करून गुन्हेगारांना ओटीपीसारखी महत्त्वाची माहिती मिळवण्याची संधी मिळू शकते. मात्र, या प्रकरणात नेमके काय घडले, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT