बेळगाव : मुचंडी येथील जागृत देवस्थान सिद्धेश्वर यात्रेला गुरुवार पासून भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला असून शुक्रवार दि. 11 रोजी मुख्य इंगळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शेकडो भाविकांनी देवाचे दर्शन घेऊन इंगळ्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
दरम्यान गुरुवारी सायंकाळी अंबिल गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी हर हर महादेव च्या गजर करत गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांसह बालचमू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील मुख्य रस्त्यावरून या आंबिल गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सजवलेल्या बैलगाड्या व गुलालाची उधळण करत तसेच पारंपारिक वाद्यांचा गजर करण्यात आला. यात्रेनिमित्त सिद्धेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती.
तर आज शुक्रवार दि 11 रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता. यावेळी मंदिरात देवाचा अभिषेक करून विधीवत पूजा अर्चा करण्यात आली. उपस्थित भाविकांनी महाआरती केली. त्यानंतर पुन्हा गावात पुन्हा अंबिल गाड्यांची काढण्यात आली. यावेळी गावातील मुख्य मार्गावर ही मिरवणूक काढण्यात आली.
तसेच सायंकाळी 5 वा. मंदिर परिसरात इंगळ्यांचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला. यात्रेनिमित्त शनिवार दि. 12, रविवार दि. 13 आणि सोमवार दि 14 असे तीन दिवस कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे.