बेळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणानिमित्त गुरुवारी खरेदीला उधाण आल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले होते. विजयादशमीनिमित्त शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांत दुचाकी, कार, दागिने, कपडे खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने सुमारे 250 कोटी रुपयांची उलाढाल झाली.
कपडे, दुचाकी व चारचाकी वाहने तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. यंदा जीएसटी कपातीनंतर पहिलाच खरेदी उत्सव असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. जीएसटी कपातीमुळे खरेदीदारांना यंदा फायदा झाला.
दसर्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सराफी व्यवसायात सुमारे 100 कोटी रुपयांची उलाढाल झाली. जिल्ह्यात सुमारे 700 हून अधिक चारचाकी वाहनांची विक्री झाली. या वाहन विक्रीतून सुमारे 100 कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. इलेक्ट्रिक दुचाकी 300, तर पेट्रोलवरील 1 हजार दुचाकींची विक्री झाली. यातून सुमारे 18 कोटी रुपयांची उलाढाल झाली. अन्य अवजड वाहन विक्रीतूनही मोठी उलाढाल झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. जिल्ह्यात तयार कपडे, साडी, ड्रेस मटेरियल विक्रीतून सुमारे 20 कोटींची उलाढाल झाली.
सोने व चांदी दराने उच्चांक गाठल्याने खडेबाजार व शहापूर येथील सराफी बाजारपेठेत यंदा उलाढाल मोठी झाली, पण सोने व चांदी खरेदीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले दरवर्षीच्या तुलनेत यंदा 35 टक्के विक्रीत घट झाल्याचे येथील सराफ व्यावसायिक अनिल पोतदार यांनी सांगितले. त्याशिवाय इलेक्ट्रिक उपकरणेही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. फ्रिज, टीव्ही तसेच मोबाईल खरेदीला ग्राहकांनी पसंती दिल्याचे दिसून आले.
यंदा सोने, चांदी दराने विक्रम केला आहे. मात्र, अनेक ग्राहकांनी हा दर आणखी वाढेल म्हणून दसर्याच्या मुहूर्तावर खरेदीची संधी साधली. सोने, चांदी विक्रीचे प्रमाण कमी झाले असून, एकूण उलाढाल स्थिर आहे. अनेक ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. मात्र, दरामध्ये मोठी घट शक्य नाही.- वैभव वेर्णेकर, अध्यक्ष, दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशन, शहापूर