बेळगाव : बेळगावचे सांस्कृतिक वैभव असलेली, 107 व्या वर्षातील ऐतिहासिक पारंपरिक शिवजयंतीची चित्ररथ मिरवणूक मंगळवारी सायंकाळी निघणार असून, त्यासाठी बेळगाव नगरी सज्ज झाली आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावे मिरवणुकीत सादर होणार असून, संपूर्ण शहरात शिवकालाची अनुभूती येणार आहे. जिल्हा प्रशासनाने डीजेचा आवाज मर्यादित ठेवण्याच्या सूचना केल्या असल्यामुळे यावर्षी जिवंत देखावे आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण हेच विशेष आकर्षण असेल.
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाकडून अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पारंपरिक शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी चित्ररथ मिरवणुकीत सुमारे 60 मंडळे सहभागी होणार आहेत. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता मारुती गल्लीतील मारुती मंदिरातून पालखी नरगुंदकर भावे चौकात आल्यानंतर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे पूजन होणार आहे. महापालिकेने कॉलेज रोड येथे प्रेक्षा गॅलरी उभारली आहे.
मिरवणूक मार्गातील अडथळे दूर केले आहेत. म. ए. समिती, सकल मराठा समाजाच्या वतीने चित्ररथ मिरवणुकीत सहभागी कलाकारांना मोफत वेशभूषा व रंगभूषा करण्यात येणार आहे. दुपारी तीनपासून या सेवेचा कलाकारांनी लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.
शहापूर विभाग मिरवणूक मार्ग
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरतर्फे मंगळवारी (दि. 21) सायंकाळी सहा वाजता बॅ. नाथ पै चौकात पहिल्या चित्ररथाचे पूजन करून चित्ररथ मिरवणुकीचे उद्घाटन होणार आहे. शहापूर चित्ररथांचा मार्ग, शहापूर खडेबाजार, छत्रपती शिवाजी उद्यान मार्गे, श्यामाप्रसाद मुखर्जी रोड, कपिलेश्वर उड्डाणपूल, शनिमंदिर, स्टेशनरोड, सेंट मेरीजजवळून उभा मारुती आणि धर्मवीर संभाजी महाराज चौक असा आहे. बेळगावचे चित्ररथ कपिलेश्वर ब्रीजकडे पोहोचण्याआधी शहापूरचे चित्ररथ या ब्रीजवरून निर्दिष्ट मार्गावरून येऊन मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील.