बेळगाव : जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष आणि पोलिस खात्याच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. ६) शहरातील शहापूर परिसरात कोटपा (तंबाखू नियंत्रण) कायद्यांतर्गत विशेष धडक कारवाई राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ४८ जणांविरुद्ध प्रकरणे नोंदवून दंड आकारण्यात आला.
जिल्हा अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर तसेच शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. थेट व अप्रत्यक्ष तंबाखू जाहिराती करणाऱ्यांनाही कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी एकूण ४८ जणांविरुद्ध प्रकरणे नोंदवून दंड आकारण्यात आला.
यासोबतच लोकांमध्ये तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत राज्य तंबाखू नियंत्रण कक्षाचे विभागीय समन्वयक महांतेश उळ्ळागड्डी, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या समाजसेविका कविता राजण्णावर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सतीश सज्जन, द्यामण्णा दुमण्णावर, विठ्ठल बिदरी आदी उपस्थित होते.