बेळगाव

Belgaum News : अधिवेशन बेकायदा; विरोध करणारच

मध्यवर्ती म. ए. समिती बैठकीत निर्धार : आंदोलनात अधिकाधिक लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : काळ्या दिनाच्या फेरीत युवा वर्गाने मराठी माणसांची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे म. ए. समितीलाही बळ मिळाले असून कर्नाटक सरकारच्या बेकायदा विधिमंडळ अधिवेशनाला तीव्र विरोध करण्यात येणार आहे. महामेळाव्याला परवानगी मिळणार नाही, हे गृहित धरून गनिमी काव्याने विरोधाची तयारी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी (दि. १७) मराठा मंदिरात झाली. अध्यक्ष प्रकाश मरगाळे अध्यक्षस्थानी होते. मरगाळे म्हणाले, लोकांच्या सहभागामुळेच गेल्या सत्तर वर्षांपासून चळवळ सुरू आहे. प्रशासनाने अनेक निर्बंध आणले तरी समितीने लढा सुरूच ठेवला आहे. काळ्या दिनाच्या फेरीत युवा वर्गाने मराठी माणसांची ताकद दाखविली आहे. प्रशासनाला चांगलाच हिसका दिला आहे. आता विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महामेळाव्याला प्रशासन परवानगी देणार नाही, असे गृहित धरूनच लढा करावा लागणार आहे. त्यासाठी गनिमी कावा वापरावा लागणार आहे. या आंदोलनात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे.

कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, महामेळाव्याला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नसली, तरी ती नाकारल्याचे पत्रही दिलेले नाही. त्यामुळे अधिवेशनाविरोधात आंदोलनासाठी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. मराठी माणसाला खंबीर उभे राहण्याची वेळ आता आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आंदोलन हाच पुरावा असणार आहे. त्यामुळे मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आंदोलन करावेच लागणार आहे. प्रशासनाने कितीही खटले घातले तरी ते लढविण्याची तयारी आमची आहे. त्यामुळे मराठी जनतेने आणि नेत्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

राजाराम देसाई, डी. बी. पाटील, अनिल पाटील, गोपाळ पाटील, जगन्नाथ बिर्जे, ॲड. एम. जी. पाटील, रामचंद्र मोदगेकर, शिवाजी खांडेकर, रणजित चव्हाण-पाटील, आबासाहेब दळवी, नारायण सांगावकर आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, मल्लाप्पा गुरव, आर. एम. चौगुले, रावजी पाटील, आर. के. पाटील, बी. डी. मोहनगेकर आदी उपस्थित होते.

सहा जणांची समिती

विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महामेळावा किंवा आंदोलनासाठी गनिमी कावा वापरावा लागणार आहे. त्यासाठी सहाजणांची समिती स्थापन करण्यात येणार असून त्यांच्या निर्णयाची सर्वांनी अंमलबजावणी करावी, अशा सूचना मनोहर किणेकर यांनी केल्या. तर सीमाप्रश्नी पुणे येथील कार्यकर्ते आणि कोल्हापूर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रात काम करत आहेत, त्यांचे अभिनंदनही बैठकीत करण्यात आले.

श्रेयवादाचे राजकारण नको

बैठकीत मध्यवर्ती म. ए. समितीने घटक समित्या वगळता कोणतीही समिती स्थापन केलेली नाही. कोणालाही समन्वयक म्हणून नियुक्त केलेले नाही, असे जाहीर करण्यात आले. तसेच श्रेयवादाचा फटका म. ए. समितीला बसू नये, सर्वांनी मर्यादा राखून वागावे, असे आवाहन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT